Published on
:
22 Jan 2025, 12:30 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:30 am
आरवली : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामात आरवली (ता. संगमेश्वर) येथील उड्डाणपूल भरावाचे बांधकाम करत असताना शेजारी रहात असलेल्या श्रीमती लक्ष्मी चारुदत्त पेडणेकर यांच्या घराला तडे जाऊन घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत आ. किरण सामंत यांनी दिलेल्या आदेशामुळे आधिकार्यानी तातडीने नुकसानग्रस्त घराची पहाणी करुन पंचनामा केला. आ. सामंत यांनी यामध्ये लक्ष घातल्याने पेडणेकर यांना नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
आरवली येथे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामात उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस भराव टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे. भरावाचे काम सुरू असताना पुलाच्या शेजारील लक्ष्मी पेडणेकर यांच्या घराच्या भिंतींना ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. संपूर्ण घरच धोकादायक बनले आहे.
ही बाब येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता परकर यांनी महामार्ग अधिकार्यांच्या निदर्शनास आणूनही संबधित आधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले . परंतु दत्ता परकर यांनी ही समस्या आमदार शेखर निकम व राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या कानावर घातली. सामंत यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालून कोकण भुवन नवी मुंबई येथे संबंधित अधिकार्यांची बैठक घेतली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत कार्यालयाचे कांबळे, बांधकाम खात्याचे रहाटे आदी आधिकार्यांनी पेडणेकर यांच्या नुकसानग्रस्त घराला भेट देऊन पहाणी केली. नुकसानाचे मूल्यांकन करून घराचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येऊन नुकसानभरपाई मिळेल, असे सांगण्यात आले.
नुकसानग्रस्त घराची पाहणी करण्यास आलेल्या बांधकाम खात्याच्या अधिकार्यांना उड्डाणपुलाच्या दुतर्फा जाणार्या सेवारस्त्याच्या डांबरीकरण व नाल्यासंबंधी विचारणा करण्यात आली. त्यावेळी नाल्याचे काम या आठवड्यात सुरु होईल मात्र, डांबरीकरण कामास विलंब होईल, असे अधिकार्यांनी सांगितले. वहाळ फाट्याजवळील सेवारस्त्याचे डांबरीकरण होते मग आरवलीचे का नाही?
दत्ता परकर, सामाजिक कार्यकर्ते आरवली.