Published on
:
18 Nov 2024, 12:30 am
Updated on
:
18 Nov 2024, 12:30 am
सांगली : काँग्रेस पक्षाचा फायदा घेऊन पद, प्रतिष्ठा मिळवता. पक्ष तुम्हाला सर्व काही देतो. पक्षाने सर्व दिल्यावरही गद्दारी करणे योग्य नाही. असे झाले तर पक्ष कोणता विचार घेऊन चालेल, याचा विचार करा, असे प्रतिपादन अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.
सांगली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारासाठी खा. खर्गे रविवारी येथे आले होते. नेमिनाथ नगरातील कल्पद्रुम क्रीडांगणावर आयोजित या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सभेत एम. डी. पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, आमदार विश्वजित कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शंभुराज काटकर यांच्यासह तिन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी व असंख्य नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्राच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा असून, या विचारासाठी महाराष्ट्र कोणतीही लढाई लढायला तयार असल्याचे खा. खरगे यांनी सांगितले.
सांगली जिल्हा हा यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, वसंतदादा पाटील, पतंगराव कदम यांनी मोठा केला असल्याचे सांगून, महाविकास आघाडी आणि पृथ्वीराज पाटील यांना विजयी करून ही विचारधारा जपा, असे आवाहन त्यांनी केले. ही काही पंतप्रधान पदाची निवडणूक नाही. तरीही देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि योगी अनेकदा महाराष्ट्रात आले. योगींच्या राज्यात मेडिकल कॉलेजमध्ये लहान मुले दुर्घटनेत गेली असतानाही, त्यांचे महाराष्ट्रात फिरणे बंद झाले नाही. पंतप्रधान झाल्यानंतरही मोदींची सत्तेची तहान संपलेली नाही. ते जगभर फिरतात, पण त्यांनी अगोदर आपले घर सांभाळले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
आ. विश्वजित कदम म्हणाले, ही विधानसभेची नाही, तर महाराष्ट्राच्या स्वराज्याची निवडणूक आहे. सांगलीत खासदारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले. पण त्यानंतर अनेक प्रयत्न करूनही विधानसभेला बंडखोरी झाली. आता कोणत्याही परिस्थितीत पृथ्वीराज पाटील यांना विजयी केलेच पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यमान आमदारांना रस्त्यांवरचे साधे खड्डेही का मुजवता आले नाहीत? अशी विचारणा पृथ्वीराज पाटील यांनी केली. त्यांना विमानतळ करता आले नाही, एकही मोठा प्रकल्प आणता आला नाही, असे ते म्हणाले. हळदीची बाजारपेठ सांगलीबाहेर गेली, ती का थांबवता आली नाही? असा सवाल त्यांनी केला.
भाजपला फक्त कट करून काँग्रेसमध्ये बंडखोरी घडवता आली, असा आरोपही त्यांनी केला. पाच वर्षे सांगलीसाठी योगदान दिल्यानंतर आता पाच वर्षे आमदार करून सेवेची संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले. जे या सभेत नाहीत, त्यांचाही आपणाला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.
वयाच्या 83 व्या वर्षीही मी काँग्रेस विचारासाठी काम करतो आहे. पक्षाचे सर्व फायदे घेऊन पक्षाशीच गद्दारी करणे योग्य नाही. इथले खासदार काँग्रेसच्या पाठबळावर विजयी झाले. इथल्या अपक्ष उमेदवारांचाही मी सन्मान करतो. कारण त्या काँग्रेस विचारधारेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांना हवे ते देऊ, असे पक्षाने सांगितले होते, याचे कारण वसंतदादा घराणे आणि सांगलीच्या काँग्रेसमध्ये फूट पडता कामा नये, असा शब्द मी दिला होता. पण हा शब्द कामी आला नाही. झोपलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही, अशी नाराजीही खा. खरगे यांनी व्यक्त केली.
इंदिरा गांधी यांनी जेव्हा 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, तेव्हा वसंतदादा पाटील यांनी सगळ्यात अगोदर त्याला समर्थन दिले होते. गरिबांना सहज कर्ज मिळू शकेल यासाठी त्यांनी समर्थन दिले. इंदिरा, राहुल, प्रियांकांनाही वसंतदादा घराण्याने पाठबळ दिले. पण आता अपक्ष उभे राहिल्याने त्याचा फायदा भाजपला होईल, याचा विचार करायला हवा, असे आवाहन खरगे यांनी केले.
भाजप आणि आरएसएस विखारी साप आहेत. देशासाठी त्यांच्यातले कितीजण लढले? ते फक्त हिंदू-मुस्लिम वाद घडवायचे काम करतात. त्यांना देशात एकात्मता ठेवायचीच नाही. त्यामुळे ते कधी काय करतील सांगता येत नाही. त्यांच्याकडे खूप पैसा आहे. त्यांच्या सार्या घोषणा बोगस आहेत. महाराष्ट्रात तर चोरांचे सरकार आहे, खोक्यांचे सरकार आहे. सरकारच पैसे वाटत असेल, तर लोकशाही वाचेल का, असा सवाल खा. खरगे यांनी केला.