Published on
:
18 Jan 2025, 1:00 am
Updated on
:
18 Jan 2025, 1:00 am
बार्शी : पांगरी, येडशी भागात आलेल्या वाघाला पकडण्यासाठी गत चार दिवसापासून प्रयत्नशील असलेल्या पथकाला शुक्रवारी उशिरापर्यंत तरी यश आले नव्हते. दरम्यान, याचदिवशी सायंकाळी उक्कडगाव शिवारात वाघाकडून चार तर बिबट्याकडून वैराग भागात वासराचा बळी गेला.
सायंकाळी पाचच्या सुमारास उक्कडगाव शिवारात वाघाने नामदेव गोविंद थोरात या पशुपालकाच्या डोळ्यासमोर त्यांच्या चार पाळीव प्राण्यांचा बळी घेतला. सुदैवाने तेथून पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले. दुसर्या घटनेत वैराग भागातील जोतिबाची वाडी शिवारातील नागेश कापसे या शेतकर्याच्या शेतातील कोठ्यात बांधलेले वासरू बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेले. वाघ एकीकडे तर पथक दुसरीकडे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दोन घटनेवरून दिसून आले.
शुक्रवारी शोध मोहिमेत तब्बल पन्नास अधिकारी व इतर पन्नासच्या आसपास कर्मचारी सहभागी झाले होते.चार दिवसापासून सुरू असलेल्या या शोध मोहिमेत पथकाला वाघ येण्या जाण्याच्या जागा,शिकार केलेल्या जागा, तो पुन्हा पुन्हा फिरून त्याच त्याच ठिकाणी येण्याच्या जागा याचा चांगला अभ्यास झाला आहे.त्यामुळे लवकरच वाघ पकडणार्या या पथकाला मोहिमेत यश येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ताडोबा येथून आलेल्या पथकाने व वन विभागाकडून तयार करण्यात आलेल्या पथकानी पुन्हा ढेंबरेवाडी, कारी, येडशी,पांढरी, आदी भागात फिरून पाहणी केली होती. दरम्यान आज अनेक वरिष्ठ अधिकार्यांनीही या मोहिमेमध्ये सहभाग घेतला.