शेवटच्या क्षणी संघात संधी लाभलेल्या हर्षित राणाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करताना हिंदुस्थानी संघाला थरारक सामन्यात अनपेक्षितपणे 3 विकेट घेत विजय मिळवून देण्याचा पराक्रम केला. त्याने 33 धावांत 3 विकेट टिपत हातातून निसटत चाललेल्या सामन्यात हिंदुस्थानला 15 धावांनी विजय मिळवून देत हिंदुस्थानची टी-20 मालिका विजयाची परंपरा कायम राखली. पाच सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानने 3-1 अशी विजयी आघाडी घेतल्यामुळे रविवारी मुंबईत होणारी अखेरची लढत औपचारिकता पूर्ण करणारी ठरणार आहे.
साकिब महमूदने आपल्या पहिल्याच निर्धाव षटकात संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि सूर्यपुमार यादव यांच्या विकेट काढत हिंदुस्थानची 3 बाद 12 अशी केविलवाणी अवस्था केली होती. मात्र त्यानंतर शिवम दुबे (53) आणि हार्दिक पंडय़ा (53) यांनी 38 चेंडूंत केलेल्या 87 धावांची झंझावाती भागीने हिंदुस्थानला 9 बाद 181 अशी जबरदस्त मजल मारून दिली. हिंदुस्थानच्या 182 धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्ट (23) आणि बेन डकेट (39) यांच्या 61 धावांच्या वेगवान सलामीनंतर हॅरी ब्रूकच्या 26 चेंडूंतील 51 धावांच्या फटकेबाजीने इंग्लंडला विजयपथावर आणले होते. पण तेव्हाच वरुण चक्रवर्थीची फिरकी आणि हर्षित राणाच्या भन्नाट गोलंदाजीने इंग्लंडची मधली फळीच कापून टाकत हिंदुस्थानला सामन्यात पुनरागमन करून दिले. अखेर इंग्लंडने मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी गमावली आणि हिंदुस्थानने मालिका जिंकली. पदार्पणवीर हर्षित राणा हिंदुस्थानच्या थरारक विजयाचा मानकरी ठरला.