ठाणे : प्रत्येक सर्वसामान्य माणूस त्याचे स्वत:चे हक्काचे घर असावे, असे स्वप्न घेवून जगत असतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो खूप कष्ट घेतो. अशा सर्वसामान्यांचे हे स्वप्न म्हाडा पूर्ण करीत आहे. नवीन गृहनिर्माण धोरण तयार होत असून आगामी पाच वर्षात आठ लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून शाश्वत विकासांतर्गत सर्वसामान्यांना परडवणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 2 हजार 147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबईच्या मुख्याधिकारी रेवती गायकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, म्हाडाच्या सह अधिक्षक वंदना सुर्यवंशी, मुख्य अभियंता शिवकुमार आडे, देखरेख कमिटीचे सदस्य व इतर अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी शिंदे बोलत होते.
ते पुढे म्हणाले मागील आठवड्यात पुणे व पिंपरी-चिंचवड येथील घरांची लॉटरी काढण्यात आली. घरांच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याच्या स्प्ष्ट सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. ज्यांना आज घरे मिळाली त्यांचे अभिनंदन व ज्यांना नाही मिळाली त्यांना येथील पारदर्शी व्यवस्थेमुळे पुढील लॉटरीत निश्चितपणे घरे मिळतील, असा विश्वास आहे. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांना आणि गरजूंना आपल्या हक्काचे परवडणारे दर्जेदार घर मिळावे, यासाठी शासन कटीबद्ध आहे.
अडीच वर्षात शासनाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. आपण आता नवीन गृहनिर्माण धोरण करतोय. या गृहनिर्माण धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवतोय. त्यामध्ये परवडणारी घरे पाहिजेत, परवडणारी भाड्याची घरे पाहिजेत त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी घरे पाहिजेत. वर्किंग वूमन साठी घरे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, गिरणी कामगार, कंपन्यांमधील कामगारांसाठी घरे, पोलीसांसाठी, डबेवाले तसेच पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गिरणी कामगारांनादेखील या माध्यमातून आपण घरे देणार आहोत.
कोकण मंडळात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. सध्याच्या लॉटरीमध्ये 2 हजार 147 सदनिकांचा समावेश आहे. यात 20 टक्के सर्वसमावेशक योजनेमधील 594 सदनिका (ठाणे व कल्याण), म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेतील 728 सदनिका (ठाणे, कल्याण, रत्नागिरी), 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेतील 825 सदनिका (डोंबिवली) यांचा समावेश आहे. या सदनिकांसाठी एकूण 31 हजार 465 अर्ज प्राप्त झाले. या सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 23 चौरस मीटर ते 50 चौरस मीटर दरम्यान असून सदनिकांची सरासरी किंमत रुपये 10 लाख ते 35 लाखापर्यंत आहे
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीत तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले. तर आभार प्रदर्शन कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबईच्या मुख्याधिकारी रेवती गायकर यांनी केले.