पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या रुसव्याफुगव्यांवरून महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री पद न मिळाल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे, तर दुसरीकडे स्वजिल्हा न मिळाल्याने अजित पवार गटातही नाराजी असल्याचे पुढे आले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील मंत्र्यांना सोयीचे जिल्हे मिळाल्याने महायुतीमधील तिन्ही पक्षांत धुसफुस सुरू झाली आहे.
राज्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील नाराजी समोर येताना दिसली आहे. त्यातच रायगड, नाशिकसह अन्य जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत मतभेद दिसत आहेत. अशातच हे वाद होत असताना भेटीगाठींचा सिलसिलादेखील वाढला आहे, तर दुसरीकडे शिवसेनेनंतर आता पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही धुसफुस असल्याचे पुढे आले आहे. स्वजिल्हे किंवा शेजारचे जिल्हे न देता शेकडो किलोमीटर दूरवरचे जिल्हे दिल्याने राष्ट्रवादीतील मंत्र्यांमध्ये नाराजी सूर असल्याचे पुढे आले आहे. महायुतीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या 20 पैकी 7 आणि शिंदे गटाच्या 12 पैकी 7 मंत्र्यांना स्वजिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले गेले आहे, तर अजित पवार गटाच्या दहापैकी केवळ एक म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे स्वजिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. आदिती तटकरेंना स्वजिल्हा मिळाला होता, मात्र शिंदे गटाच्या आक्षेपानंतर त्यास स्थगिती देण्यात आली आहे.
दादांनी स्वतःपुरते, तर तटकरेंनी लेकीपुरते पाहिले
अजित पवारांनी स्वतःपुरते आणि सुनील तटकरे यांनी लेकीपुरते पाहिले, परंतु पक्षातील इतर मंत्र्यांना त्यांचे जिल्हे मिळविण्यासाठी प्रयत्न केले नसल्याची कुरबुर सुरू आहे. मिंधे गट आणि अजित पवार गटातही ठिणगी पडली आहे. गोगावले यांनी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर थेट आरोप केले आहेत.
कुंभमेळ्यात मंत्र्याचे काय काम?
नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयालाही स्थगिती दिली गेली. तरीही गिरीष महाजन यांनाच नाशिकचे पालकमंत्री बनवण्यात यावे यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते आग्रही आहेत. नाशिकमध्ये 2027 मध्ये कुंभमेळा होणार आहे. महाजन यांना यापूर्वीचा कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाचा अनुभव असल्याचे भाजपा नेते म्हणत आहेत. त्यावरून अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खिल्ली उडवली आहे. कुंभमेळ्यात सर्व काम अधिकारीच करतात, तिथे मंत्र्याचे काय काम असा सवाल त्यांनी केला आहे.
– हसन मुश्रीफ यांचा मूळ जिल्हा कोल्हापूर आहे, मात्र त्यांच्याकडे 625 किमी लांब असलेला वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
– नाशिकच्या माणिकराव कोकाटे यांच्याकडे 195 किमी अंतरावर असलेल्या नंदुरबारची जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिकच्या नरहरी झिरवाळ यांच्याकडे 445 किमी लांब असलेल्या हिंगोलीचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
– मकरंद पाटील हे सातारा जिल्ह्यातील असले तरी त्यांच्याकडे 440 किमी लांब असलेल्या बुलढाण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती देण्यात आली आहे, तर लातूरच्या बाबासाहेब पाटील यांना 636 किमीवरचा गोंदिया जिल्हा दिला गेला आहे.