पुणे : अभूतपूर्व यशाचा जल्लोष चौकाचौकांत करण्यात आला. महिला कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.Pudhari File Photo
Published on
:
24 Nov 2024, 12:19 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:19 am
पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आलेल्या त्सुनामी लाटेत महाविकास आघाडी जिल्ह्यात अक्षरश: वाहून गेली. जिल्ह्यात 21 पैकी तब्बल 19 जागा महायुतीने पटकाविल्या, तर केवळ दोनच जागा मविआला राखता आल्या. एक जागा अपक्षाला गेली आहे.
महाविकास आघाडीतील वडगाव शेरीचे उमेदवार माजी आमदार बापू पठारे, खेड- आळंदी मतदारसंघातील शिवसेनेचे (उबाठा) बाबाजी काळे यांनी लक्षवेधी विजय मिळविले. जुन्नर मतदारसंघात अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी विजय मिळवित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. शहरातील पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ, खडकवासल्यात भीमराव तापकीर यांनी आपल्या विजयाची हॅट्ट्रिक केली, तर उच्च व तंज्ञ शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे या भाजपच्या उमेदवारांनी आपल्या जागा राखल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) चेतन तुपे यांनीही आपली जागा राखण्यात यश मिळविले आहे. पिंपरीतील अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), भोसरीतील महेश लांडगे (भाजप) यांनीही आपापल्या जागा राखल्या आहेत. बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आंबेगावमधून सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) यांनी सलग आठव्यांदा विजयी होत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, मावळमधून सुनील शेळके, दौंडमध्ये राहुल कुल हेही पुन्हा विजयी झाले.
वडगाव शेरीतून बापू पठारे विजयी
वडगाव शेरी मतदारसंघातून बापू पठारे (राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार) यांनी सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार) यांचा चार हजारांहून अधिक मताधिक्य घेत पराभूत केले.
हडपसरचा ट्रेंड तुपे यांनी बदलला
हडपसर मतदारसंघातील मतदार प्रत्येकवेळी नव्या प्रतिनिधीला संधी देतात, असे गेल्या काही निवडणुकांतून स्पष्ट झाले होते. तथापि, आमदार चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार) यांनी दणदणीत विजय मिळवित हा ट्रेंड मोडीत काढला.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि रमेश बागवे यांच्यासह माजी आमदार रवींद्र धंगेकर, दिलीप मोहिते, अशोक पवार, संजय जगताप, संग्राम थोपटे, चंद्रकांत मोकाटे अशा मातब्बर राजकारण्यांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
जुन्नरमध्ये अपक्षाची बाजी
जुन्नर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी धक्कादायक विजय मिळविला आहे, तर खेड-आळंदीत आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना शिवसेनेच्या (उबाठा) बाबाजी काळे यांनी पराभूत केले आहे. शिरूरमधून अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर कटके विजयी झाले. इंदापूरमध्ये चुरशीच्या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांचा पराभव केला. पुरंदरमधून शिवसेनेचे (शिंदे गट) विजय शिवतारे यांनी आमदार संजय जगताप यांचा पराभव केला, तर शंकर मांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) यांनी भोरमध्ये संग्राम थोपटे यांना पराभूत केले. चिंचवडमध्ये भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांनी राहुल कलाटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांचा पराभव केला.