Published on
:
18 Jan 2025, 12:36 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:36 am
सांगोला : सांगोला शहर आणि तालुक्यात छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना, लुटमार, वाहतुकीचा प्रश्न, वाळू वाहतूक, मोबाईल चोरी, अनुचित प्रकार, हाणामारीसारख्या घटना घडत आहेत. यामध्ये सण उत्सव निमित्ताने नेहमीच चोरीच्या घटना घडत असताना चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे ठरत आहेत. बंद पडलेले कॅमेरे दुरुस्त करून घ्यावेत. कॅमेरे सुरू झाल्यास चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
यामुळे पोलिस प्रशासनाला शहरामध्ये घडणार्या गुन्ह्यांचा तपास लावण्यामध्ये मदत मिळणार असल्याने पोलिस प्रशासनाने पुढाकार घेऊन शहरातील नादुरुस्त असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून घ्यावेत. सांगोला शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, चोरीला व गुन्हेगारीला आळा बसावा व वाहतुकीवर नियंत्रण रहावे.
शहरातील शांतता अबाधित रहावी, या हेतुने रोटरी क्लब, सांगोला पोलिस स्टेशन, व्यापारी व लोकसहभागाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये बिघाड झाली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सांगोला पोलिस स्टेशनकडून शहरातील रोटरी क्लब व नागरिकांच्या सहकार्यातून प्रमुख चौक व वर्दळीच्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. तर सांगोला बसस्थानकाच्या उजवीकडील बाजुस व वासुद चौकाच्या समोर पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. शहरात मुख्य चौकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहचण्यासाठी यापूर्वी चांगली मदत मिळाली आहे. तसेच कॅमेर्यांच्या निगराणीमुळे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये पोलिसांना यशदेखील मिळाले आहे. परिणामी शहरातील गुन्हेगारीला वचक बसणार असे चित्र निर्माण झाले होते आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला होता. मात्र लाखो रुपये खर्च करुन बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांतील बिघाडामुळे शहरातील कायदा, सुव्यवस्था व शांतता पुन्हा ऐरणीवर येण्याच्या मार्गावर आहे.
मागील 7 वर्षांपासून कॅमेर्यांची करडी नजर बंद झाल्याने शहरात प्रत्येक चौकाचौकात बोळा-बोळात अवैधधंदे खुलेआम सुरू आहेत. वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. भुरट्या चोर्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अवैध वाळू वाहतूक यासारख्या अनेक घटना खुलेआम घडत असल्याने शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीला पुन्हा वाव मिळत आहे. याकडे पोलिसांचे सरळसरळ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. याबाबत सर्वसामान्य नागरिक तक्रार करण्यास गेल्यानंतर आमच्याकडे कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले जात आहे.