Ladki Bahin Yojana | 'बांगलादेश'मधील बहिणही लाडकी; चक्क सरकारी योजनेचा घेतला लाभ file photo
Published on
:
23 Jan 2025, 5:35 am
Updated on
:
23 Jan 2025, 5:35 am
मुंबई : Ladki Bahin Yojana | महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. राज्यातील महिला या योजनेचा लाभ घेत असताना मुंबईत अवैधपणे राहणाऱ्या एका बांगलादेशी महिलेनेही बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहिणचा फायदा घेतल्याचे उघड झाले आहे.
गुन्हे गुप्तचर विभागाने (सीआययू) बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याबद्दल कामठीपुरा येथून पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली, ज्यात तीन महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी महादेव यादव (वय ३४) यालाही आश्रय आणि रसद पुरवून बेकायदेशीर स्थलांतर करण्यास मदत केल्याबद्दल अटक केली आहे. पकडलेल्या बांगलादेशी महिलांपैकी एक उर्मिला ही २३ वर्षीय महिला आहे. तिला विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते मिळाले आहेत. पोलिसांनी तिचे आधार कार्ड बनावट असल्याचे सांगितले. मात्र तिचे वकील सुनील पांडे यांनी तिला लाडकी बहिण योजनेचे फायदे मिळाले आहेत, यावरून ती भारतीय नागरिक असल्याचा दावा केला आहे.
अटक करण्यात आलेला एक बांगलादेशी नागरिक मोहम्मद ओसिकुर रहमान उर्फ झियादली शद्दर याला याआधीही भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याबद्दल अटक करण्यात आले होते. कायदेशीर कारवाईनंतर त्याला बांगलादेशात पाठवण्यात आले, परंतु २०१४ मध्ये तो पुन्हा भारतात आला. जलाल शेख (वय २८), अलीम रसूल अली (वय २३) आणि मोहम्मद ओसिकुर रहमान, अशी अटक करण्यात आलेल्या इतर बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, रहमानने बांगलादेशातून मुंबईत तरुणी आणि महिलांची तस्करी केली. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने खेतवाडी येथून आणखी चार बांगलादेशी नागरिक आणि एका साथीदाराला अटक केली. जोगेश्वरी, कांदिवली आणि नवी मुंबई येथे शोधमोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये चार बांगलादेशी नागरिक आणि एका भारतीय नागरिकाला ताब्यात घेण्यात आले.