बारामतीत बोगस मतदान, मतदान केंद्रावर दमदाटी:युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवारांचा आरोप, अजित पवारांकडून आरोपांचे खंडण

3 days ago 1
राज्यातील हायव्होल्टेज बारामतील मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला आहे. दमदाटी करून मतदान करून घेतले जात आहे. ते कुणाचे कार्यकर्ते होते माहिती नाही, पण नक्कीच घड्याळाचे होते हे मी सांगू शकते, असे शर्मिला पवार यांनी सांगितले. तर अजित पवार यांनी या आरोपांचे खंडण केले आहे. बारामतीत बोगस मतदान झाले नाही. तक्रारीमध्ये काही तथ्य असेल, तर काही अर्थ आहे. माझे पोलिंग एजंट धमकावण्याची भाषा करणार नाहीत, असे अजित पवार म्हणाले. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी राज्यभरात शांततेत मतदान सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी मतदान प्रक्रियेला गालबोट लागले आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदानाच्या तक्रारीही मिळाल्या आहेत. बारामतीमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. शर्मिला पवार यांचा आरोप काय? शर्मिला पवार म्हणाल्या की, माझ्यासमोर एका व्यक्तीने मतदान केंद्रावर दमदाटी केली. तो जणूकाही स्वत:च्या घरचे लग्न असल्यासारखे या, बसा वगैरे सांगत होता. खाणाखुणा करून मतदारांशी बोलत होता. काय संकेत देत होता माहिती नाही. आम्ही आक्षेप घेतला आणि असे न करण्याची विनंती केली. आमचा मोहसीन त्यांना तेच सांगत होता. पण त्याला त्यांनी धमकी दिली. मग पोलिसांनी त्यांना लगेच बाहेर काढले. त्यानंतर मी बाहेर आले. तिथे गेटच्या बाहेर आतल्या व्यक्तीच्या मोठ्या भावाने “तुला मी बघून घेईन” अशी धमकी दिली. ते कुणाचे कार्यकर्ते होते माहिती नाही, पण नक्कीच घड्याळाचे होते, हे मी सांगू शकते. मी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत आहे. आता ते सीसीटीव्ही फूटेज डिलीटही केले जाण्याची भीती आम्हाला वाटत आहे, असेही शर्मिला पवार यांनी यावेळी म्हटले. अजित पवारांनी फेटाळले आरोप अजित पवार यांनी शर्मिला पवार यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शर्मिला पवार यांनी केलेले आरोप हे धादांत खोटे आहेत. माझा माझ्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही एवढ्या निवडणुका पार पडल्या पण आमच्या कार्यकर्त्यांनी कधीही अशी काही वक्तव्य केली नाही. माझे पोलिंग एजंट धमकावण्याची भाषा वापरणार नाही. आम्ही इतक्या वर्षांपासून निवडणुका लढत आहोत. तसेच तक्रार दाखल झाली असेल तर पोलिस आणि निवडणूक आयोग त्यावर कारवाई करतील. केवळ तक्रारीला काही अर्थ नाही. त्यात काही तथ्य असेल, तर त्याला अर्थ आहे, असे सांगत अजित पवार यांनी आरोपांचे खंडण केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article