Published on
:
22 Jan 2025, 12:01 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:01 am
केळघर : केळघर परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच सोमवारीही एका शेतकर्याच्या गायीवर बिबट्याने हल्ला केला. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. परंतु, वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी कोणतीच कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
केळघर परिसरात असणार्या खिलार मुरा या वस्तीतील झिमू ढेबे यांची गाय बिबट्याने फस्त केली. चोरांबे , कुसुंबी मुरा येथेही या बिबट्याने गायी फस्त केल्या आहेत. याबाबत वन विभागाला वारंवार माहिती देवूनही वन विभागाच्या अधिकार्यांनी गांधारीची भूमिका घेतली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याऐवजी केवळ जनजागृती केली जात आहे.
सोमवारी सायंकाळी झिमू ढेबे हे जनावरे चरण्यासाठी गेले असता अचानक झुडपातून येत बिबट्यावर हल्ला केला. यामध्ये गाय ठार झाली आहे. तीन दिवसांपूर्वी वडाचा दंड बावी या शिवारातही बिबट्याने अनेक प्राण्यांवर हल्ला केला आहे. रात्री केळघर वरून कुरुळोशी कडे प्रवास करणार्या चाकरमान्यांनाही हा बिबट्या रस्ता ओलांडताना अनेक वेळा दिसला आहे. एखाद्या माणसाचा फडशा पाडल्यानंतरच वनविभाग झोपेतून जागा होणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.