Published on
:
01 Feb 2025, 3:03 pm
Updated on
:
01 Feb 2025, 3:03 pm
केज : श्रावणबाळ योजनेतील त्रुटी बाबत चौकशी करण्यासाठी आलेले वृद्ध महिला गावाकडे जात असताना बस स्टँडवरून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्याने चोरले आहेत.
या बाबतची माहिती अशी की,देवगाव ता. केज येथील सुमन हरीभाऊ मुंडे ही ७२ वर्षे वयाची महिला तिचा भाऊ बाबासाहेब हरीभाऊ मुंडे व भावजय आसराबाई बाबासाहेब मुंडे हे तहसील कार्यालय केज येथे श्रावणबाळ योजनेच्या अनुदाना बाबत चौकशी करून दुपारी ३:०० वा. केज बस स्टँड वरून गावाकडे परत जात होते. परत जात असताना ते केज-पिराचीवाडी एस. टी. बसमध्ये चढत असताना सुमन हरीभाऊ मुंडे यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची पोत चोरीला गेली आहे. तिची किंमत ३० हजार रु. अशी आहे. वृध्द महिलेच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी हे तपास करीत आहेत.
चोऱ्या रोखण्याची पोलीस, एसटी महामंडळासह प्रवाशांची सुद्धा जबाबदारी
केज बस स्टँडवर नियमित होत असलेल्या चोऱ्या व महिलांच्या गळ्यातील दागिने यांच्या चोऱ्या रोखण्यासाठीही पोलिसांनी सतर्क राहणे आवश्यक असून ज्या भागात सीसीटिव्ही नाहीत त्याच ठिकाणी चोऱ्या होत असल्याने एसटी महामंडळाने सर्व परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. तसेच प्रवाशांनी प्रवास करताना दागिने व पैसे याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.