केस गळती होऊन टक्कल पडू लागल्याने बुलडाणा जिल्ह्यातील 13 गावांमधील महिला, पुरुष आणि मुले भयभीत झाली आहेत.
Published on
:
03 Feb 2025, 12:59 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:59 am
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील पंधरा गावांत नागरिकांना अचानकपणे टक्कल पडण्याचा प्रकाराने गेल्या महिनाभरात खळबळ उडवून दिली होती. टक्कल पडलेल्या नागरिकांच्या शरीरात सेलेनियम नावाचा धातू आढळून आला आहे. गव्हाच्या माध्यमातून सेलेनियम धातू शरीरात गेल्याने टक्कल पडत असल्याचा प्राथमिक अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआर या देशाच्या सर्वोच्च संस्थेने दिला आहे. दरम्यान, या अहवालानंतर बुलडाणा जिल्ह्यातील रेशन दुकानांना पुरवला जाणार्या गव्हाची उचल थांबविण्यात आली आहे.
गेल्या जानेवारीत टक्कल पडण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. केसाचे नमुनेही घेण्यात आले होते. गावातील पाण्यासह विविध बाबींची तपासणी केल्यानंतरही टक्कल पडण्याचे कारण स्पष्ट होत नव्हते. आयसीएमआरच्या पथकानेही प्रत्यक्षात भेटी देवून कारणांचा शोध सुरु केला होता. नागरिकांच्या रक्ताचे आणि केसाचे नमुने नेण्यात आले होते. त्याची सखोल तपासणी केली असता सेलेनियम नावाचा धातू आढळून आला.
गावात रेशन दुकानातून पुरवठा केल्या जाणार्या गव्हातून सेलेनियम धातू नागरिकांच्या शरीरात गेल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, केंद्राच्या एका पथकाने खामगाव येथे असलेल्या या गोदामातील गहू, तांदूळ व इतर धान्याचे नमुने घेतले. कमालीची गोपनीयता पाळत हे पथक शनिवारी दिल्लीला रवाना झाले आहे. या गोदामातील धान्य उचलही या पथकाने थांबवली असल्याची माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे.