थांब्यांवर वाहन थांबवण्यासाठी सातारा परिसरातील बॉम्बे रेस्टॉरंंट व वाढे फाट्यावर प्रवाशांच्या जीवघेण्या कसरती सुरू आहेत. Pudhari Photo
Published on
:
22 Jan 2025, 12:15 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:15 am
खेड : पुणे-बेंगलोर महामार्गावरील खराब रस्त्यांची साडेसाती कमी म्हणून की काय म्हणून प्रवाशांनी आता ठिकठिकाणी बेकायदा थांबे निर्माण केले आहेत. या थांब्यांवर वाहन थांबवण्यासाठी सातारा परिसरातील बॉम्बे रेस्टॉरंंट व वाढे फाट्यावर प्रवाशांच्या जीवघेण्या कसरती सुरू आहेत. भल्या सकाळी व सायंकाळी प्रवासी वाहनांसाठी चक्कमार्गावरच ठाण मांडत असल्याने भीषण दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे. हे बेकायदा प्रवासी थांबे एखादेवेळेस जीवाला मुकायला लावणारे आहेत. या थांब्यांना व प्रवाशांना अटकाव कोण करणार? हा प्रश्न कायमच आहे.
महामार्गावरच होतेय प्रवाशांची चढ-उतार
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात उड्डाणपुलानजीक महामार्गावरून सातारा शहराकडे येणार्या मार्गावर कोल्हापूर, कराड तसेच पुणे-मुंबई बाजूकडे जाणारे प्रवासी महामार्गावरच खासगी वाहनांची प्रतीक्षा करत उभे असतात. या वाहनांना हात दाखविण्यासाठी प्रवासी निम्म्या मार्गावर येत असतात. प्रवाशांना घेण्यासाठी कंटेनर, टँकर, खासगी वाहने आणि एसटी बसही एकामागून एक थांबत असतात. त्यामुळे एक मार्ग वाहनांनेच अडवला जातो. महामार्गावरच वाहने थांबून प्रवाशांची चढ - उतार चालू असते. त्यामुळे ही ठिकाणे धोकादायक बनू लागली आहेत.
सेवारस्ता व महामार्गावरच खासगी वाहने, ट्रॅव्हल्स उभी असल्याने धोका
बॉम्बे रेस्टॉरंट, वाढे फाटा परिसरात प्रवासी मिळवण्यासाठी खासगी वाहने, ट्रॅव्हल्स सेवारस्ता आणि महामार्गावरच उभी असतात. सायंकाळी सहानंतर यात वाढ होत असते.
फुकटात वाहनतळ उपलब्ध होत असल्याने तसेच प्रवासीही मिळत असल्याने या ठिकाणी पार्किंग वाढत आहे. त्याकडे स्थानिक पोलिस, महामार्ग पोलिस दुर्लक्ष करीत आहेत.
याठिकाणी अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. याला वेळीच निर्बंध न आणल्यास मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.