Published on
:
18 Jan 2025, 12:38 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:38 am
सोलापूर : महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे होर्डिंग उभारल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे आणि बीएसएनएल या तीन कार्यालयांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. एका रेस्टो बार आणि डोळ्याच्या दवाखान्यावर बेकायदा एलईडी लावल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदा होर्डिंगप्रकरणी कारवाईची मोहीम चालू आहे. जाहिरात संस्था, राजकीय नेते, बिल्डर यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. महापालिका आयुक्तांच्या आदेशाने झोन अधिकार्यांना कारवाईचे अधिकार दिले आहेत.
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी शासकीय कार्यालयांना आपले टार्गेट केले आहे. रेल्वे प्रशासनाने पत्रकार भवन, सात रस्ता आणि रेल्वे स्टेशन परिसरात सात, बांधकाम विभागाने सात रस्ता परिसरात, बीएसएनएलनेही सात रस्ता परिसरात आपल्या जागेत होर्डिंग उभी केली आहेत. होर्डिंग उभे करताना स्ट्रक्चरल ऑडिट केले नाही. महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नाही. दुर्घटना घडल्यास नागरिकांचा या होर्डिंगमुळे जीव जाण्याची शक्यता असल्याचा ठपका या तिन्ही शासकीय कार्यालयांवर ठेवला आहे.
त्यांच्यावर गुन्हे दाखल करा
जुना एम्प्लॉयमेंट चौकात एका रेस्टो बार चालकाने आपल्या हॉटेलची जाहिरात डिजिटल फलकावर केली आहे. तसाच प्रकार परिसरातील एका नेत्र रुग्णालयाच्या डॉक्टरांनीही केला आहे. या डिजिटल फलकामुळे येणार्या जाणार्या नागरिकांच्या डोळ्याला त्रास होऊन अपघात होण्याची शक्यता असल्याने या दोन्ही आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.