सावंतवाडी ः पत्रकार परिषदेत बोलताना दीपक केसरकर. सोबत सोनाली केसरकर-वगळ, सूरज परब, अशोक दळवी आदी.pudhari photo
Published on
:
18 Nov 2024, 1:05 am
Updated on
:
18 Nov 2024, 1:05 am
सावंतवाडी ः युवकांत असणारी अस्वस्थता लक्षात घेऊन उद्योग, हॉटेल इंडस्ट्री, विविध पातळ्यांवर रोजगार, नोकरी मार्गदर्शन, समन्वयक म्हणून पुढील काळात हॉटेल मॅनेजमेंटमध्ये देशात पहिली आलेली माझी मुलगी सौ. सोनाली केसरकर - वगळ आणि इंजिनिअर सूरज परब तरुणांसाठी काम करतील, असा विश्वास महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दीपक केसरकर म्हणाले, जिल्ह्यातील व राज्यातील बेरोजगार युवकांमधील अस्वस्थता पाहता जिल्ह्यात रोजगार निर्मिती करण्यासह जर्मनीसारख्या देशात उच्च पगाराच्या नोकर्या आम्ही देत आहोत. महाराष्ट्र शासनाकडून तसा करार जर्मन देशाशी झाला आहे. भारतातला हा मोठा करार आहे. यासाठी पहिली बॅच जर्मनीला रवाना होत आहे. राज्यातून दीडशे मुले जात असून 25 मुले जळगावची व उर्वरित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. (Maharashtra assembly poll)
जिल्ह्यात विविध उद्योगांसह पर्यटन योजना कार्यान्वित होत आहेत. ‘चांदा ते बांदा’ व ‘सिंधुरत्न’ या योजनांमधील विविध उपक्रम हे स्थानिक शेतकरी, लघू व्यवसायिक, बचतगट महिला यांचे उत्पन वाढविणारे आहेत. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीत उद्योग सुरू करण्यास अनेक कंपन्या इच्छूक आहेत. यातून हजारो मुलांना नोकर्या उपलब्ध होणार आहेत. मात्र आडाळी एमआयडीसीबाबत विरोधक चुकीच्या पद्धतीने युवकांत गैरसमज निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सावंतवाडी एसटी स्टँड बीओटी तत्त्वावर बांधण्यात येत आहे तर कणकवली बसस्थानकाचे कामही याच तत्वावर लवकरच सूरू होणार आहे. सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. युवराज लखमराजे यांनी त्याबाबत त्यांनी स्पष्ट केले आहे.
माझा राजकीय वारस परिस्थितीनुसार ठरेल!
माझ्यासोबत संजू परब आले आहेत. ते देखील आमदारकीसाठी इच्छुक होते. इथे प्रत्येकाला संधी आहे. राजकीय वारस घोषित करायला मला परंपरागत राजकीय वारसा नाही. मला सामाजिक वारसा होता. त्या माध्यमातून मी राजकारणात आलो. त्याचा फायदा गोरगरीब जनता, महिला, युवकांसाठी केला. ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझा वारसदार तयार झाला पाहिजे. तो माझा नाही तर पक्षाचा वारसदार असेल. त्यावेळीच्या परिस्थितीनुसार ठरणार उमेदवार हाच वारसदार असेल असे विधान केसरकर यांनी केले. (Maharashtra assembly poll)
मुलगी माझ्या सामाजिक कार्याची वारसदार
मुलगी सोनाली ही माझी राजकीय वारसदार नाही तर माझ्या कुटुंबाच्या सामाजिक कार्याची ती वारसदार आहे. आमच्या कुटुंबाने हा वारसा जपला आहे. थेट राजकारणात असणारा मी एकटा असून आमच्या कुटुंबातील बाकी कोणीही राजकारणात नाही व नव्हते. माझ्या मुलीच्या कार्याचा फायदा गोरगरीबांच्या हितासाठी व्हावा, असे मला वाटते.