Published on
:
16 Nov 2024, 11:51 pm
Updated on
:
16 Nov 2024, 11:51 pm
बेळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून नावगे (ता. बेळगाव) येथील एक एकर जमिनीची परस्पर रिलीज डीड तयार करून हडपल्याची तक्रार मार्केट पोलिस ठाण्यात झाली आहे. परशुराम वैजू कर्लेकर (रा. रामलिंग गल्ली, नावगे) यांनी यासंबंधीची फिर्याद दिली आहे. त्यानुसार बॉन्ड रायटरसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये एक अनोळखी पुरूष, रेणुका मल्लाप्पा पाटील, प्रसाद परशुराम हुरकडली (दोघेही रा. नावगे), बसाप्पा राजप्पा बसरगी (रा. देवगिरी, ता. बेळगाव) व बॉन्ड रायटर अशोक पी. पाटील (रा. बेळगाव) यांचा समावेश आहे. याबाबत माहिती अशी, फिर्यादी कर्लेकर यांच्या मालकीची एक एकर शेतजमीन नावगे गावच्या हद्दीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती त्यांच्या कब्जात असून ते पिकवत आले आहेत. 30 जुलै 2024 मध्ये एक अनोळखी पुरूष, शेतजमिनीची रिलीज डीड तयार करणारे साक्षीदार व बॉन्ड रायटर या सर्वांनी संगनमताने फिर्याददाराच्या शेतजमिनीची बनावट कागदपत्रे बनवली. ती कायमस्वरुपी मिळवण्यासाठी रिलीज डीड तयार करण्याच्या उद्देशाने शेतजमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली.
या प्रकरणातील संशयित प्रसाद व बसाप्पा यांना हे नकली कागदपत्रे असल्याचे माहिती असूनही त्यांनी खोटे सांगून बेळगाव येथील उपनोंदणी कार्यालयात सादर केली. या प्रकरणातील संशयित रेणुका पाटील यांनी विश्वासघात व फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून निरीक्षक महांतेश धामण्णवर तपास करत आहेत.