बेळगाव : येथील उपनोंदणी अधिकार्याच्या घरातील कागदपत्रे व मुद्देमालाची तपासणी करताना लोकायुक्त निरीक्षक निरंजन पाटील व अन्य. Pudhari File Photo
Published on
:
01 Feb 2025, 12:18 am
Updated on
:
01 Feb 2025, 12:18 am
बेळगाव : शहरातील प्रथम दर्जा साहाय्यक तथा प्रभारी उपनोंदणी अधिकारी तसेच रायबाग तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकार्यावर शुक्रवारी (दि. 31) लोकायुक्तांनी एकाचवेळी छापे टाकले. सकाळच्या वेळी छापे टाकून दिवसभर केलेल्या तपासात दोन्ही अधिकार्यांकडे कोट्यवधीचे घबाड सापडले आहे.
शहरातील सचिन बसवंत मांडेदार येथील उपनोंदणी कार्यालयात प्रथम दर्जा साहाय्यक आहेत. सध्या येथील उपनोंदणी अधिकारी पद रिक्त असल्याने त्यांच्याकडेच या पदाचाही प्रभार आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक मालमत्ता असल्याची तक्रार लोकायुक्त खात्याकडे गेली होती. त्याला अनुसरुन शुक्रवारी सकाळी त्यांच्या शहरातील पाच मालमत्तांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये बारा गुंठ्याचे शेतकी भूखंड, एक भूखंड, 50 लाखाचे बांधकाम सुरु असलेले घर, सुमारे दीड लाखांची रक्कम, 81 लाखांचे सोने, 5 लाखाची 5 किलो चांदी, अडीच लाखांची वाहने, बँकेतील ठेव 68 लाख, शेअरमार्केटमध्ये 15 लाख असा तब्बल 2 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडे सापडला आहे. उपनोंदणी कार्यालय, अनगोळ येथील घरासह पाच ठिकाणी छापे टाकले. लोकायुक्त विभागाचे निरीक्षक निरंजन पाटील व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली.
रायबाग तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी संजय आण्णाप्पा दुर्गण्णावर यांच्यावरही लोकायुक्त छापा टाकण्यात आला. त्यांचे घर व निलजीतील पशुवैद्यकीय कार्यालयात छापा टाकण्यात आला. त्यांच्याकडे सोने, वाहने, शेतकी भूखंड यासह तब्बल 1 कोटी 40 लाखांचे घबाड मिळाले आहे.