Published on
:
16 Nov 2024, 11:42 pm
Updated on
:
16 Nov 2024, 11:42 pm
बेळगाव : घरात वेश्याव्यवसाय चालवल्याचा आरोप करून मायलेकीला जबर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबद्दल शेजारचे पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. मारहाणीत माय-लेकीचे कपडे फाडण्यात आल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला पोलिसांनीही हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार पीडित मुलीने मांडली आहे.
रामनगर वड्डरवाडी येथे एका मायलेकीच्या घरात नेहमी अनोळखी पुरूष येत असल्याने त्यांच्यावर वेश्या व्यवसायात गुंतल्याचा आरोप करत इंद्रा हुवाप्पा अष्टेकर, तिचा पती हुवाप्पा अष्टेकर व मुलगा मणीकंठ अष्टेकर (तिघेही रा. रामनगर, वड्डरवाडी) यांनी 13 नोव्हेंबर रोजी मारहाण केली. अनेक दिवसांपासून या माय-लेकीच्या घरी अनोळखी पुरूष येत होते. याबाबत उपरोक्त अष्टेकर कुटुंबीयाने त्यांना जाब विचारला. त्यातून भांडण झाले आणि माय-लेकीला मारहाण झाली. मारहाणीवेळी माय-लेकीचे कपडे फाटले, शिवाय आईची साडीही सुटली.
मारहाण झाल्यानंतर काहींनी मध्यस्थी करून हे प्रकरण परस्पर मिटवले होते. परंतु, मायलेकींनी दुसर्या दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला जिल्हा रुग्णालयात जाऊन तपासणी करवून घेतली. प्रक्रियेनुसार जिल्हा रुग्णालयाकडून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस चौकशी सुरू झाली. माय-लेकींना अर्धनग्न करत मारहाण, अशा आशयाचे वृत्त माध्यमांमध्ये पसरल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. शनिवारी हे वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर पोलिसांनी शनिवारी तिघांना अटक केली. त्यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली.
वंटमुरीसारखे प्रकरण होऊ नये म्हणून....
गेल्या डिसेंबर महिन्यात वंटमुरी येथे महिलेला अर्धनग्न करून मारहाण झाल्याची घटना राज्यभर गाजली होती. तशाच आशयाची ही घटना असल्याचे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. तथापि, तशी मारहाण झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, प्रकरण गंभीर होऊ नये, यासाठी संबंधितांना अटक करून कारागृहात रवानगी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांकडून असहकार्य : पीडिता
मारहाण पीडित महिला, तिची मुलगी आणि दोन नातवंडे वड्डरवाडीतील घरात राहतात. मुलीने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ः तिचे कोल्हापूरला लग्न लावून देण्यात आले होते. तिला दोन मुलेही आहेत. मात्र सासरच्या लोकांशी न पटल्याने ती आपल्या माहेरी आईसमवेत वड्डरवाडीत राहते. गेल्या बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक अष्टेकर कुटुंबीयांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली, तसेच घरातून बाहेर काढून मारहाण केली. केस ओढण्यात आले, कपडे फाडण्यात आले. या प्रकारानंतर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेता, तुम्हाला मारहाण का झाली ते सांगा, असा हेका लावला. माळमारुती पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून न घेतल्याने या पीडितांपैकी विवाहित मुलीने प्रसार माध्यमांसमोर कैफियत मांडली.
माय-लेकीला अर्धनग्न करून मारहाण झाल्याचे वृत्त शहरात पसरल्यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली. आ. राजू सेट यांनीही या महिलेची विचारपूस केली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची सूचना आमदारांनी केल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली.