भंडारा: जवाहरनगर येथील आयुध निर्माणीत २४ जानेवारी रोजी झालेल्या भीषण स्फोटात ८ कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले, तर ५ कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हा स्फोट नेमका कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी तीन चौकशी समित्या स्थापन करण्यात आल्या. दरम्यान, मृतक आणि जखमींच्या कुटुंबियांना दिलेल्या आश्वासनांची अद्यापही पूर्तता करण्यात न आल्याने कामगारांमध्ये असंतोष आहे.
२४ जानेवारी रोजी झालेल्या स्फोटानंतर इमारतीमध्ये दबले गेलेल्या कर्मचाऱ्यांचे बचावकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेत एकूण ८ कर्मचारी मृत्यूमुखी पडले तर ५ कर्मचारी गंभीर जखमी झाले. २५ जानेवारी रोजी मृत कर्मचार्यांचे कुटुंबिय आणि गावकर्यांनी सर्व मृतदेह कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून आंदोलन केले. या आंदोलनाला लोकप्रतिनिधींचीही जोड मिळाली. कंपनी प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या चर्चेअंती मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांचे अर्थसहाय्य तात्काळ देण्यात येईल व उर्वरित ५० लाखांच्या अर्थसहाय्यासाठी केंद्र सरकारसोबत पाठपुरावा केला जाईल, असे ठरले होते.
त्यानुसार ५० लाखाचे धनादेश कुटुंबियांकडे स्वाधीन करण्यात आले. परंतू, उर्वरित ५० लाख रुपयांच्या अर्थसहाय्यासाठी कंपनीकडून कोणतीही हालचाल होत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या स्फोटात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना ५ लाख रुपये देण्याचेही ठरले होते. परंतू, यावरही कंपनीकडून पाठपुरावा सुरू नसल्याची माहिती आहे. या व अशा काही कारणांमुळे कर्मचाऱ्यांनी अद्यापही कामबंद आंदोलन सुरूच ठेवले आहे. तर कंपनी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर काम सुरू करण्यासाठी दबाव आणला जात आहे. शुक्रवारी काही कर्मचाऱ्यांनी स्वच्छता आणि साफसफाईला सुरूवात केली. त्यामुळे सोमवारपासून कंपनीचा कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे.