भाजप तालुकाध्यक्ष वैद्य यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा; कार्यकर्त्यांत खळबळ File Photo
Published on
:
19 Jan 2025, 9:47 am
Updated on
:
19 Jan 2025, 9:47 am
शेवगाव: विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार न केल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याकडे दिला आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. मोनिका राजळे व त्यांचे समर्थक यांच्याशी असलेल्या वैचारिक मतभेदाने वैद्य व कार्यकारिणी प्रचारात सहभागी झाली नाही. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी हा राजीनामा दिला. पदाचा राजीनामा दिला असला, तरी ते पक्षाचे कार्यकर्ते राहणार आहेत.
वैद्य यांची 6 फेब्रुवारी 2024 रोजी तालुकाध्यक्षपदी निवड झाली होती. या अगोदर त्यांच्यावर 2010 ते 2016 अशी दोन वेळेस अध्यक्षपदाची, तर 2009मध्ये जिल्हा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यांनी ठिकठिकाणी पक्ष शाखा स्थापन व नवीन कार्यकर्ते संघटित केले.
आ. राजळे यांचे कार्यकर्ते आणि जुनी भाजप यांच्यात सौख्य राहिले नाही, तरीही त्यांनी प्रामाणिक काम केले. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आ. राजळे गटाने जुन्या भाजप कार्यकर्त्यांना कायम विरोध केला.
त्यामुळे मागील काळात प्रामाणिक काम करून बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उघड उमेदवारी बदलण्याची भूमिका ठेवली व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला.
विधानसभा निवडणुकीत आ. मोनिका राजळे यांनाच पक्षाने उमेदवारी दिली. या काळात पक्षाचा उमेदवार या नात्याने प्रचार केला असता, तरी तो मान्य केला नसता म्हणून आपण शांत राहिलो याची नैतिक जबाबदारी स्वीकारून हा राजीनामा देत आहे.
- तुषार वैद्य, भाजप तालुकाध्यक्ष, शेवगाव
विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याने पक्ष कारवाई करील या भीतीने त्यांनी हा राजीनामा दिला असावा. आणखी काही कार्यकर्ते याच प्रकारे दुटप्पी आहेत. त्यांच्यावरही पक्ष कारवाई होणार आहे. मतदारसंघात जुना-नवा असा काहीच वाद नाही. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत मला मोठे मताधिक्य मिळाले आहे. मात्र, डबल ढोलकीवाले यांनी दुटप्पी राजकारण केले आणि पक्षविरोधी भूमिका घेतली.
- आ. मोनिका राजळे