Published on
:
28 Nov 2024, 12:43 am
Updated on
:
28 Nov 2024, 12:43 am
- प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर, परराष्ट्र विश्लेषक
भारत-गयाना संबंधामध्ये नवा मैलाचा दगड प्रकाशमान झाला आहे. या जॉर्जटाऊन परिषदेत उभय राष्ट्रांनी वर्तमान जगासमोरील ज्वलंत प्रश्न संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गाने सोडविण्यावर भर दिला. भविष्यकाळात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी भागीदारी सक्रिय करण्याचे ठरविले आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या तसेच जागतिक व्यवस्थेमध्ये अमूलाग्र प्रशासकीय सुधारणा करण्यावर उभय राष्ट्रांनी आग्रह धरला.
गयाना हा दक्षिण अमेरिकेच्या उत्तर किनार्यावरील एक निसर्गसंपन्न देश आहे. तेथे विपुल तेलसाठा सापडला आहे. तसेच खनिज संपत्तीही विपुल आहे. अनेक जलस्रोतांनी युक्त जमीन असा गयाना शब्दाचा अर्थ होतो. त्याचा अन्योन्य अर्थ भक्कम परस्पर सहकार्य असाही होतो. हा भूराजनैतिकद़ृष्टीने एक महत्त्वाचा प्रदेश असून गेल्या 180 वर्षांपासून भारताशी निगडीत आहे. गयानावर डच, फ्रेेंच व शेवटी बि—टिशांचे राज्य होते. 1966 मध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळाले आणि 1970 मध्ये ते प्रजासत्ताक राष्ट्र बनले. तेथे बि—टिश वसाहत असताना भारतीय श्रमिक शेतीच्या कामासाठी म्हणून 186 वर्षांपूर्वी गेले. त्यांची संख्या तेथे वाढत गेली आणि आजमितीस 43 टक्के भारतीय गयानाच्या राजकीय भविष्याचे आधारस्तंभ बनले आहेत. भारताच्या पंतप्रधानांची पाच दशकांनंतरची ही गयाना भेट आहे. त्यांच्या महत्त्वपूर्ण अशा गयाना भेटीमुळे उभय राष्ट्रांमध्ये राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधात एक नवे पर्व उदयास आले आहे. कॅरेबियन सागराच्या क्षेत्रात भारत आपल्या प्रभुत्वामुळे नवे मित्र निर्माण करीत आहे आणि एकीकडे भारताची अलिप्त राष्ट्र चळवळ प्रारंभीच्या काळात जेथे पसरली त्या भागात आता भारत स्वयंसिद्धपणे आपले प्रभुत्व वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ग्लोबल साऊथ किंवा दक्षिणेकडील जगाचा आवाज बुलंद करण्यात भारताचे पाऊल निर्णायक ठरत आहे. याद़ृष्टीने पंतप्रधानांच्या गयाना दौर्याचे वेगळेपण या लेखात स्पष्ट केले आहे.
1968 मध्ये तेव्हाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी गयानाला भेट दिली होती आणि 56 वर्षांनंतर गयानाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. त्यांच्या या भेटीमुळे उभय राष्ट्रांमध्ये दीर्घकालीन भागीदारीचे एक नवे पर्व उदयास आले आहे. प्रामुख्याने विविध क्षेत्रांतील सहकार्यासाठी तयार करण्यात आलेली ही चौकट पुढील काळातही अधिक भक्कम होण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदी आणि इटलीचे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांच्यात झालेली सौहार्दपूर्ण चर्चा ही नवा मैलाचा दगड ठरली आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या द़ृष्टीने गयानाशी झालेले करार हे भविष्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतील. अमेरिका, कॅनडानंतर आता गयाना हा कच्च्या क्रूड तेलाची निर्मिती करणारा एक मोठा देश आहे आणि त्याच्या या नवीन सहस्रकातील उपलब्धतेचा भारताला भविष्यात चांगलाच फायदा होणार आहे. यावेळी झालेले महत्त्वपूर्ण करार म्हणजे भावी संबंधाची वीण भक्कम करणारे ठरले आहेत. गयाना नैसर्गिक साधन सामूग्रीच्या द़ृष्टीने समृद्ध आहे. तेथे लिथियम व सोन्याच्या खाणी आहेत. शिवाय एक पर्यटनस्थळ म्हणूनसुद्धा त्याला विशेष महत्त्व आहे. भारत गयानातील शेती, उद्योग तसेच शिक्षण या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून सहाय्य व मार्गदर्शन करू शकतो आणि दोन्ही राष्ट्रांतील अदान- प्रदानामुळे उभयताना चांगला लाभ होऊ शकतो. भविष्यात भारत गयानाकडून कच्च्या तेलाची खरेदी करू शकतो आणि ऊर्जा क्षेत्रातील बिकट समस्या सोडविण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकतो.
भारत आणि गयानामध्ये अतूट असा सांस्कृतिक धागा गेल्या दोन शतकांपासून बांधलेला आहे. त्यामुळे विमानतळावर मोदी यांचे जंगी स्वागत झाले, ही गोष्ट औचित्यपूर्ण म्हटली पाहिजे. 20 वर्षांपूर्वी मोदी व्यक्तीशः एकदा त्यांच्या खासगी भेटीत गयानाला गेले होते. त्यामुळे त्यांची गयानाला ही दुसरी भेट आहे. तेथील लोकसंख्येच्या 43.5 टक्के भारतीय वंशाचे लोक गयानाचे रहिवासी आहेत. त्यांची एकूण संख्या 3 लाख 20 हजारांपेक्षा अधिक आहे. तेथे सागरकिनारी उपलब्ध होत असलेला तेलाचा प्रचंड साठा हे गयानाच्या नैसर्गिक साधन सामुग्रीचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. याबाबतीत भारत त्यांना प्रगत तंत्रज्ञान व मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन त्यांच्याशी तेल उत्पादन, शुद्धीकरण, निर्मिती प्रक्रिया तसेच तेल खरेदी या बाबतीत भविष्यकाळात महत्त्वाकांक्षी करार करून नवी उपलब्धी निर्माण करू शकतो.
भूराजनैतिकद़ृष्टीने विचार करता मोदी छोट्या राष्ट्रांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचा आवाज बुलंद करीत आहेत व भारताच्या शक्ती साधनेत त्यांचे सामर्थ्य आपल्या बाजूने वळवीत आहेत. हे एक त्यांच्या राजनीतीचे वेगळेपण होय. त्यांनी आग्नेय आशियात ब—ुनेई (बोर्नियो) तसेच दक्षिण अमेरिकेतील सुरीनाम आणि आता गयाना यासारख्या देशांबरोबर द़ृढ मैत्री संबंध प्रस्थापित करून आर्थिक संबंधाची वीण अधिक भक्कम केली आहे. शेजारच्या व्हेनेझुएला या देशाला मागे टाकून गयाना तेल उत्पादनात मोठ्या गतीने पुढे जात आहे. त्याचीही वाटचाल भारताला मित्र म्हणून फायद्याची ठरणार आहे. भारत आणि गयानामधील मैत्रीला नवी कलाटणी देणारे दहा सामंजस्य करार म्हणजे मोदी आणि तेथील अध्यक्ष यांच्या हस्तांदोलनानंतर विकसित झालेली दहा कलमी योजना होय. त्यामध्ये प्रामुख्याने हायड्रोकार्बन, डिजिटल पेमेंट प्रणाली, औषधे, रसायने, जेनेरिक औषधांची निर्मिती व पुरवठा तसेच याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे संरक्षण, उत्पादन क्षेत्रात परस्पर सक्रिय भागीदारीच्या अनेक योजना या सामंजस्य करारातून द़ृष्टिपथात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे गयाना हा भारताच्या ऊर्जा सुरक्षा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल.