Published on
:
05 Feb 2025, 1:26 pm
Updated on
:
05 Feb 2025, 1:26 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ENG ODI Series : भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी इंग्लंडने बुधवरी (दि. 5) आपला संघ जाहीर केला. नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी जो रूटचे प्लेईंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. तो 2023 च्या विश्वचषकानंतर पहिल्यांदाच वनडे खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याच्या आगमनामुळे इंग्लिश फलंदाजी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
फिल साल्ट आणि बेन डकेट यांची सलामीवीर फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. यानंतर, जो रूट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. रूटने त्याचा शेवटचा वनडे सामना भारतातच खेळला होता. 2023 च्या विश्वचषकादरम्यान तो पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरला होता. त्या सामन्यात त्याने 62 चेंडूत 60 धावा केल्या. यानंतर, तो या फॉरमॅटपासून दूर राहिला आणि त्याने लाल चेंडूच्या क्रिकेटला प्राधान्य दिले.
हॅरी ब्रुक आणि कर्णधार जोस बटलर मधल्या फळीत खेळताना दिसतील. याशिवाय, लियाम लिव्हिंगस्टोन सहाव्या क्रमांकावर खेळेल. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला जेकब बेथेल हा देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. या सामन्यात तो सातव्या क्रमांकावर खेळेल. तळातील फलंदाजांमध्ये ब्रायडन कार्से, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद आणि आदिल रशीद यांचा समावेश आहे.
वेगवान आक्रमणाचे त्रिकूट, रशीद एकमेव फिरकीपटू
इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी जोफ्रा आर्चर, ब्रायडन कार्से आणि साकिब महमूद या त्रिकूटावर असेल. इंग्लंडकडे अतिरिक्त आघाडीचा फिरकी गोलंदाज नाही, त्यामुळे त्यांना मधल्या षटकांमध्ये नियंत्रण राखण्यासाठी आदिल रशीदवर अधिक अवलंबून राहावे लागेल. तो भारतीय फलंदाजांना फसवण्यास मदत करेल. लिव्हिंगस्टोन आणि बेथेल यांच्या अष्टपैलू क्षमतेमुळे इंग्लंडकडे अतिरिक्त गोलंदाजीचे पर्याय असतील.
कर्णधार बटलर काय म्हणाला?
इंग्लिश संघाचा कर्णधार बटलरने रूटचे कौतुक केले आहे. सामन्यापूर्वीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याने रुट हा एक उत्तम खेळाडू असल्याची भावना व्यक्त केली. बटलर म्हणाला की, ‘रूट हा महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याच्याकडे सर्व फॉरमॅटमध्ये खेळण्याची क्षमता आहे. तो बऱ्याच काळानंतर इंग्लंडच्या वनडे संघाचा भाग बनला आहे. त्याचा संघाला फायदा होईल. त्याचा वनडे क्रिकेटमधील अनुभव संघातील तरुण खेळाडूंना मदत करेल.’
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना : 6 फेब्रुवारी : नागपूर (विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
दुसरा सामना : 9 फेब्रुवारी, कटक (बारबाटी स्टेडियम)
तिसरा सामना : 12 जानेवारी : अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)
पहिल्या वनडेसाठी इंग्लंडचा संघ :
बेन डकेट, फिल साल्ट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.