पर्यटन महोत्सवाच्या अनुषंगाने ना. शंभूराज देसाई यांनी अधिकार्यांना सूचना केल्या.Pudhari Photo
Published on
:
06 Feb 2025, 12:29 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:29 am
सातारा : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी दि. 26 ते 28 एप्रिल या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर येथे पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला - संस्कृती , खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
या महोत्सवाला पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटनचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात कला-संस्कृती, हस्तकला, पाककृती तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी व स्थानिक पर्यटन स्थळांना पर्यटनात्मक प्रसिध्दी देण्यात येईल. यासह महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवणार्याचे कार्यक्रम तसेच नामांकीत कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे, स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सव, महाबळेश्वर परिसरातील पर्यटन स्थळ दर्शन सहल , पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी, पॅराग्लायडींग, पॅरामोटरींग, जलक्रीडा, ट्रकिंग, रॉक क्लायबिंग, घोडेस्वारी हे उपक्रम होणार आहे. याचबरोबर स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.