जदयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार. File Photo
Published on
:
22 Jan 2025, 5:12 pm
Updated on
:
22 Jan 2025, 5:12 pm
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये भाजप आणि जनता दल (संयुक्त) यांच्यातील अंतर वाढले आहे. जदयूच्या राज्य कार्यकारणीने राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली. त्यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला, मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांना पाठिंबा काढून घेण्याचे पत्र पाठवले. मात्र, हा पाठिंबा काढून घेतल्याचा मणिपूर सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. जदयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तत्काळ कारवाई करत प्रदेशाध्यक्ष के. बिरेन सिंग यांना त्यांच्या पदावरून हटवले. तसेच मणिपूर सरकारला जनता दल ( संयुक्त) चा पाठींबा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.
जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन म्हणाले की, ही संपूर्ण घटना दिशाभूल करणारी आणि निराधार आहे. पक्षाने याची दखल घेतली असून पक्षाच्या मणिपूर अध्यक्षांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. आम्ही एनडीएला पाठिंबा दिला आहे आणि आमचा पाठिंबा कायम आहे. मणिपूरमध्येही एनडीएचे सरकार कायम राहणार आहे. राजीव रंजन म्हणाले की मणिपूर राज्य कार्यकारणीने केंद्रीय नेतृत्वाशी संवाद साधला नाही. त्यांनी स्वतःच्या इच्छेने हे पत्र लिहिले होते. अनुशासनहीनतेबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना पदावरून मुक्त करण्यात आल्याचेही सांगितले. ते म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत आम्ही एनडीएसोबत आहोत आणि राज्य कार्यकारीणी राज्याच्या विकासासाठी मणिपूरच्या जनतेची सेवा करत राहील.
दरम्यान, जदयूने बुधवारी मणिपूरमधील मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा औपचारिकपणे पाठिंबा काढून घेतला होता.