मळणीयंत्रात महिलेचे केस अडकून शीर झाले धडावेगळेFile Photo
Published on
:
15 Nov 2024, 3:53 am
Updated on
:
15 Nov 2024, 3:53 am
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा
मळणीयंत्रात मका काढत असताना अचानक मशीनमध्ये डोक्याचे केस अडकून एका मजुरी करणाऱ्या महिलेचे शिर धडावेगळे झाल्याने तिचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील वसई येथे घडली. कोकिळाबाई संजय गवळी असे मृत महिलेचे नाव आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, वसई येथे काल (गुरूवार) दुपारी गावातील फकीरराव सनान्से यांच्या शेतात मका काढणीचे काम सुरू होते. यासाठी कोकिळाबाई गवळीसह इतर मजुर महिला तेथे काम करीत होत्या. मका मशीनमध्ये टाकताना अचानकपणे कोकिळाबाई यांचे केस मशीमध्ये अडकले. यामुळे वेगाने त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या. अत्यंत गरीब असलेल्या कोकिळाबाई आणि संजय गवळी या दाम्पत्याकडे केवळ दीड एकर शेती आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न चरितार्थासाठी पुरेसे नसल्याने दोघेही पती-पत्नी रोज मजुरीची कामे करतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे विवाह झालेले असून, त्यांचा मुलगा नुकताच होमगार्डमध्ये भरती झाला आहे. त्यामध्ये परिवारात आनंदाचे वातावरण होते. दरम्यान या घडलेल्या दुर्देवी घटनेमुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.