महामार्ग खचतोय:हैदराबाद, विजापूरला जोडणाऱ्या रस्त्यावर खड्डे, मार्केट यार्ड चौकात उड्डाणपुलाचे काम प्राथमिक स्तरावर

6 hours ago 1
मार्केट यार्ड चौकातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल केला जात आहे. त्या कामाची प्राथमिक सुरुवात करण्यात आली आहे. उड्डाणपुलाचे काम होण्यासाठी साधारण दोन वर्ष लागतील. या चौकात मोठ मोठे तीन खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या डागडुजी कडे दुर्लक्ष होत आहे. मार्केट यार्ड चौक म्हणजे सोलापूर पुणे ते सोलापूर हैदराबादला जोडणारा दुवा आहे. तसेच काही वाहने शहरात येतात आणि असंख्य वाहनांची मार्केट यार्ड मध्ये रेलचेल होत असते. यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुक असते. म्हणून या चौकात नेहमी वाहतुक पोलिस तैनात असतात. जड वाहतुकीमुळे अनेक अपघात झाले. गेल्या अनेक वर्षापासून या चौकात उड्डाणपूल व्हावे अशी मागणी केली जात होती. यंदा २०२४ मध्ये येथील उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आणि ऑक्टोबर महिन्यात याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. ही सुरुवात प्राथमिक स्तरावर आहे. याला लवकरच गती मिळेल. काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पुल होतोय म्हणून रस्त्याचे काम नाही करणार का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे शिवदारे मंगल कार्यालय ते मार्केट यार्ड चौकापर्यंत तीन ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तर यार्ड पासून ते जुना बोरामणी नाका पर्यंत सुध्दा चार खड्डे झाले आहेत. याची वेळीच दुरुस्ती न केल्यामुळे लहान खड्डे आज मोठे खड्डे बनले आहेत. त्यामुळे हे खड्डे धोकादायक बनले आहेत. महापालिकेने फक्त एकच खड्डा बुजवला आहे. महापालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन सर्व खड्डे बुजवून घेणे आवश्यक आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या संदर्भात महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता ते सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मार्केट यार्ड समोरील चौकामध्ये खड्डे पडून दुचाकीचे अनेक अपघात होत आहेत. हे अपघात जरी किरकोळ असले तरी मोठा अपघात व्हायला वेळ लागणार नाही. याबाबत वारंवार सांगून सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही. कोणा निष्पापाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का. वसीम बागवान, नागरिक हैदराबाद रोड आणि विजापूर रोड हे दोन्ही महामार्ग खचत असल्याचे दिसत आहे. हैदराबाद रोडचे काम तर गेल्या अनेक महिन्यापासून रखडले आहे. जेवढे काम झाले तेथेही रस्ता खचला आहे. या रस्त्याचे काम पुर्ण केले जात नाही तर खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच विजापूर महामार्गाचे काम पुर्ण होऊन वर्ष उलटला आहे. एवढ्यात हा रस्ता सुध्दा खचला जात आहे. दोष दायित्व कालावधी असल्यामुळे याची दुरुस्ती मक्तेदारा मार्फत केली जाईल मात्र एक वर्षातच रस्ता खचल्यामुळे त्याच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित होतो. हा रस्ता खचून सहा महिने उलटले तरी अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article