Published on
:
18 Nov 2024, 12:57 am
Updated on
:
18 Nov 2024, 12:57 am
आटपाडी ः आता शेवटच्या टप्प्यात विरोधक येतील आणि देतील. मी चहा-बिस्किट म्हणत आहे, गैरसमज करून घेऊ नका. ते तुम्ही दोन्ही हाताने घ्या. ते जे देतात ते त्यांचे नाही, तुमचेच आहे. मतदान मात्र तुमच्या मनात जे आहे त्याप्रमाणे करा. कारण भाजपाचे महाराष्ट्रात सुरू असलेले गलिच्छ राजकारण दुर्दैवी आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर निशाणा साधला.
येथे खानापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी-महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव सदाशिव पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी बाबासाहेब मुळीक, हणमंतराव देशमुख, विष्णुपंत चव्हाण, प्रभाकर नांगरे, अनिता पाटील, सूरज पाटील, कविता म्हेत्रे आदी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, राजर्षी शाहूंच्या भूमीतील खासदार धनंजय महाडिक महिलांबाबत चुकीची भाषा वापरतात. तो त्यांच्या संगतीचा परिणाम आहे. कोणत्याही महिलेचा चोरून फोटो काढणे, हा गुन्हा आहे. धमकी कुणाला देत आहेत?
टेंभूचे श्रेय एकानेच घेणे चुकीचे
वैभव पाटील म्हणाले, टेंभूचे पाणी सर्वांच्या प्रयत्नातून आले. ते श्रेय एकानेच घेणे चुकीचे आहे. निवडणुकीच्या पूर्वी सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. मोठा निधी आणणार्यांनी शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राला 100 कोटी का दिले नाहीत? विरोधकांनी खानापूर-आटपाडी तालुक्यांची वाटणी केली. विट्यातून आटपाडीला येताना विचारून यावे लागते. विट्याप्रमाणे आटपाडीही देशात अव्वल करायची आहे. सर्वांच्या सुख-दुःखात मी सहभागी असतो. त्यामुळे आटपाडी तालुक्यात शिवसेनेपेक्षा एक तरी मत जास्त घेणार, हे नक्की आहे. कोणाला अडवायला किंवा जिरवायला नाही, तर शाश्वत विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी साथ द्या.
टेंभूचे श्रेय एकानेच घेणे चुकीचे
सुप्रिया सुळे म्हणाल्या, हो, माझा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला. माझ्या हातात सहा बांगड्या माझ्या आईच्या आहेत आणि त्या शेतीतील कष्टाच्या आहेत. माझा सोन्याचा चमचा हा आहे, भाऊ-बहिणीचे पावित्र्य वेगळे असते. भावाने मागितले असते, तर आम्ही सर्व दिले असते. गठुळे घेऊन गेलो नसतो. आमच्या हातातील या बांगड्या ईडी-सीबीआयच्या नाहीत.