राज्य शाळा सेवा आयोग (एसएससी) भरती घोटाळा प्रकरणी बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी दोन वर्षांहून अधिक काळापासून तुरुंगात आहेत. अशातच सर्वोच्च न्यायालयाने चॅटर्जी यांच्या जामीन याचिकेवर मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ईडीला विचारले की, आरोपींना खटल्याशिवाय किती काळ कोठडीत ठेवायचे? न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने म्हटलं की, चटर्जी दोन वर्षे चार महिन्यांपासून तुरुंगात आहेत आणि या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही.
माजी मंत्र्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. खंडपीठाने एसजीला विचारले की, ”’जर ते दोषी आढळे नाही, तर काय? अडीच ते तीन वर्षे वाट पाहणे हा काही कमी कालावधी नाही. तुमचे दोषसिद्धचे प्रमाण किती आहे? दोषसिद्ध होण्याचे प्रमाण 60-70 टक्के असते तर ठीक आहे, परंतु दोष सिद्ध होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.”
दरम्यान, चटर्जी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, 73 वर्षीय माजी मंत्री अनेक आजारांनी त्रस्त आहेत. त्यांना 23 जुलै 2022 रोजी अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो तुरुंगात आहेत. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 2 डिसेंबर रोजी होणार असून त्यानंतर सर्वोच्च न्यायालय जामीनाबाबत आदेश जारी करू शकते.