Published on
:
17 Nov 2024, 12:35 am
Updated on
:
17 Nov 2024, 12:35 am
गडहिंग्लज : माझ्या आणि कुटुंबाच्या मागे ईडीसह खोट्या कारवाया लावून छळ करणारे शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना दहा वर्षे मांडीवर घेतले होते, तिथे ते घाण करून आलेत. पवारांच्या मांडीवरही घाणच करणार आहेत, असा घणाघात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांचे नाव न घेता केला.
गडहिंग्लजमध्ये म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट प्रचारसभेत मुश्रीफ बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, गेली 35 वर्षे शरद पवारांच्या मागे उभा राहिलो. गुरुदक्षिणा म्हणून त्यागाच्या रूपाने फुल ना फुलाची पाकळी दिली; परंतु दहा वर्षे देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी फायदा घेतला. सत्तेच्या लालसेपोटी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पळून गेले. सिद्धनेर्लीच्या दलित समाजाच्या जमिनी काढून घेणारा, संजय गांधी निराधार योजनेची चौकशी लावून निराधार लाभार्थ्यांच्या आणि बांधकाम कामगारांच्या चुलीत पाणी ओतणार्या या विरोधकाला खड्यासारखे बाजूला फेका. आम्हाला पुन्हा संधी द्या. संपूर्ण आयुष्यभर जनतेची हमाली करू. मी आणि राजेश पाटील तुमच्या जीवनात चांगले दिवस आणू.
आमदार राजेश पाटील म्हणाले, माझ्या मतदारसंघात साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी फक्त मुश्रीफ यांच्यामुळेच मिळाला. मतदारसंघाचा कायापालट केला. या मतदारसंघात भाईगिरी चालू दिलीच नाही. आता ताईगिरी सुद्धा चालू देणार नाही. राजेंद्र गड्यानवार म्हणाले, श्री. मुश्रीफ फक्त कागलचेच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याचे पालक आहेत. माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, कारखाना काढण्यासाठी अडीच वर्ष रस्त्यावर होतो पण एका क्षणात माझा तो प्रवास मुश्रीफांनी यशस्वीरित्या संपवला. अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, विविध जाती धर्माचे हजारो लोक या ठिकाणी मुश्रीफांना समर्थन देण्यासाठी जमलेत, हेच त्यांच्या जातीपातीच्या पलीकडच्या कार्याचं यश म्हणावं लागेल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले, गोरगरीब दिन-दलीत वंचित उपेक्षितांचा आधार बनण्याचं काम फक्त मुश्रीफच करू शकतात. सिद्धार्थ बन्ने म्हणाले, गडहिंग्लजमधील मुश्रीफांच्या शिलेदारांवर बिनबोभाट आरोप करण्याचे काम सौ. स्वाती कोरी करत आहेत.
आईशप्पथ... रेकॉर्डब्रेक सभा!
श्री. मुश्रीफ भाषणाला उभे राहताच म्हणाले, आईशप्पथ... माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील गेल्या 15 वर्षात या क्रीडांगणावर लोकगंगेला आलेला महापूर पाहिल्यानंतर मी भारावून गेलो. या रेकॉर्ड ब—ेक सभेला मी सलाम करतो. ही ऐतिहासिक निवडणूक जनतेनेच हातात घेतली असल्यामुळेच आमचा विजय अधिक सुकर झाला आहे. यावेळी दत्ताजीराव देसाई मधुकर पाटील, राजेंद्र तारळे, संदीप नाथबुवा, किरण कदम, गुंडुराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर भाजप कागल तालुका अध्यक्ष परशुराम तावरे, भाजप गडहिंग्लज अध्यक्ष राजेंद्र तारळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, गडहिंग्लज कारखाना अध्यक्ष प्रकाश पठाडे, केडीसी बँक संचालक संतोष पाटील, सिद्धार्थ बन्ने आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत महेश सलवादे यांनी केले. अमर मांगले यांनी आभार मानले.