पुण्यात एक इसमाने त्याच्या पत्नीची हत्या करून त्याचा व्हिडीओ तयार केला आणि नंतर स्वत:हून पोलिसांत जात गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे संपूर्ण पुणं हादरलं आहे. शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली असून पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे खळबळ माजलेली असतानाच पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येही खुनाचा असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तेथे एका तरूणाचा अपघाता मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले होते, मात्र तो अपघात नसून त्याचा खून झाल्याचे उघड झाले. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या तरूणाच्या प्रेयसीनेच आपल्या मित्रांच्या मदतीनेच प्रियकराचा खून केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सहा पैकी तिघांना अटक केली आहे. रेखा भातनासे अस अटक करण्यात आलेल्या प्रेयसीची नाव आहे. हत्येच्या गुन्ह्यात प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीचा देखील समावेश असल्याने ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी लांडे असे मृत तरूणाचे नाव आहे. प्रेयसी रेखा आणि प्रियकर बालाजी यांच्यात नेहमी वाद होत होते. बालाजी रेखाचा मानसिक छळ करत होता. याच त्रासाला कंटाळून रेखाने बालाजीची हत्या करण्याचा प्लॅन केला. रेखा ज्या घरात राहत होती तिने बालाजीला त्या घरात बोलावून घेतलं. आणि दिनेश उपादे, आदित्य शिंदे इतर तिघांनी बालाजीच्या पायावर आणि डोक्यात लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बालाजीला रिक्षातून महानगर पालिकेच्या वायसीयम रुग्णालयात नेलं. रक्तबंबाळ झालेला बालाजी हालचाल करत होता. हे स्पष्ट सीसीटीव्ही वरून स्पष्ट झालं. दरम्यान,पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी रुग्णालयात बनावट नाव सांगितली. पण उपचारापूर्वीच बालाजीचा मृत्यू झाला.
कसा उघड झाला गुन्हा ?
मात्र रुग्णालयातील मृत्यूचं हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि त्यांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि सीसीटीव्ही तपासण्यास सुरूवात केली. ज्या रिक्षामधून बालाजीला आणण्यात आलं, ती रिक्षा ही चिखली मधील दुर्वांकुर सोसायटीमधील असल्याचं उघड झाले. पोलीस तिथं पोहचले, तेथे लिफ्ट मधून जात असताना त्यांना रक्ताचे काही डाग आढळले. पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यांनी त्या डागांचा माग काढला असता ते रूम नंबर 303 पर्यंत पोहोचले. तेथे रेखाची अल्पवयीन मुलगी ( वय 16) त्यांना सापडली.
पोलिसांनी तिला मृत बालाजीचा फोटो दाखवला आणि ओळख पटवली. तिची कसून चौकशी केली असता त्या मुलीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि अशा प्रकार एका खुनाला वाचा फुटली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. इतर तीन जणांचा शोध घेण्यासाठी गुंडा विरोधी पथक बीड ला रवाना झाले आहे. मानसिक त्रास देत असल्याने प्रियकराची हत्या केल्याची कबुली प्रेयसी रेखा हिने पोलिसांना दिली. हत्येच्या गुन्ह्यात प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीचा देखील समावेश असल्याने ताब्यात घेण्यात आले आहे.