Published on
:
22 Jan 2025, 12:10 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:10 am
मळेवाड : सावंतवाडी तालुक्यातील साटेली गावात पुन्हा मायनिंग सुरू केल्याने ग्रामस्थ,स्थानिक शेतकरी व मायनिंग कंपनी यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली. या मायनिंग प्रकल्पातून डंपरने होणारी खनिज वाहतूक साटेली ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी रोखून धरली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावात मायनिंग नकोच, अशीच भूमिका साटेली ग्रामस्थांची आहे. स्थानिक ग्रामस्थांचा तीव विरोध असतानाही मायनिंग कंपनीने उत्खनन सुरू केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. स्थानिकांचा विरोध न जुमानता दडपशाही व गुंडगिरीने उत्खनन केले जात असून शेतकरी, जमीनदार व ग्रामस्थांना कंपनीच्या बॉडीगार्ड कडून धमकवण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
साटेली गावात गेली दहा वर्षे मायनिग उत्खनन बंद आहे. मात्र गावातील मायनिंग पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न लीजधारक कंपनीने केला होता.परंतू उत्खनन चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा तसेच कंपनी व्यवस्थापनाकडून दादागिरी व गुंडगिरी करणारी माणसे आणून स्थानिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी या मायिनिंग उत्खननास तीव्र विरोध दर्शवला आहे. गावातील सर्व शेतकरी, बागायतदार, ग्रामस्थ, गावातील गाडी मालक यांनी साटेली ग्रामपंचायत ग्रामसभेच्या ठरावनिशी जिल्हा प्रशासन व शासनाच्या संबंधित कार्यालयांकडे गावातील मायनिंग बंद करण्याची मागणी केली आहे.
या पूर्वी याच कारणांसाठी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केल्या नंतर गेली दहा वर्षे साटेलीतील मायनिंग उत्खनन बरेच वर्षे बंद होते. या कालावधीत तत्कालीन लीजधारक धी डेक्कन मिनरल्स कंपनी व्यवस्थापन किंवा शासनाकडून गावात मायनिंग उत्खननामुळे उद्भवलेल्या समस्यांवर व झालेल्या नुकसानी बाबत कोणतेही कार्यवाही केलेली नाही. शेतकर्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही, त्यांच्या तक्रारींचे निवारण केलेले नाही, असा आरोप साटेली ग्रामस्थांचा आहे. असे असताना 4 नोव्हेंबर 2024 पासून गावातील मायनिंग उत्खनन पुन्हा सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.
गावात मायनिंग उत्खनन करणार्या कंपनीचे नाव काय? त्यांचा मालक कोण? मायनिंग क्षेत्रात वावरणार्या व्यक्ती कोण? या व्यक्ती कोणाच्या परवानगीने गावात मायनिंग उत्खनन करीत आहेत, याविषयी भूधारक, जमीनदार,शेतकार तसेच महत्वाचे म्हणजे साटेली ग्रामपंचायतीलाही याबाबत कोणतीही लेखी किंवा तोंडी कल्पना जिल्हा प्रशासनाने दिलेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. असे असताना गावात मायनिंग सुरू कसे होते? असा प्रश्न ग्रामस्थांचा आहे.
दडपशाहीने सुरु असलेले हे मायनिंग तात्काळ बंद करावे, तसेच यापुढे साटेली गावात मायनिंग प्रकल्पच प्रस्तावीत करू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थ 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडतील, असा इशारा ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांना दिला आहे.
गावा इकोसेन्सिटिव्ह तरीही...
महत्त्वाची गोष्ट म्हणजे साटेली हा इको सेन्सिटिव्ह झोन मधील गाव म्हणून जाहीर झाला आहे. मग याकडे संबंधित विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी दुर्लक्ष करतात याचा अर्थ काय?असाही ग्रामस्थांचा सवाल आहे.