मुरगाव : नगराध्यक्ष गिरीष बोरकर यांच्याशी चर्चा करताना मासळी विक्रेत्या. Pudhari File Photo
Published on
:
22 Jan 2025, 12:31 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:31 am
वास्को : मासे मार्केटची पाहणी करताना मुरगावचे नगराध्यक्ष गिरीष बोरकर यांनी मासे विक्रेत्यांसंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे संतापलेल्या मासे विक्रेत्यांनी मंगळवारी नगराध्यक्षांनाच घेराव घातला. ‘नवीन मासे मार्केटात व्यवसाय करायचा नसेल तर त्या मासे विक्रेत्यांनी घरी जावे’ असे वक्तव्य कोणत्या आधारावर केल्याचे विक्रेत्यांना विचारले. दोन तास ठिय्या मांडलेल्या विक्रेत्यांना नगराध्यक्षांवर प्रश्नांची सरबत्तीच केली. अखेर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे नगराध्यक्ष गिरीष बोरकर यांनी सांगितले.
मुरगाव पालिका मंडळाची मंगळवारी 21 रोजी बैठक होती. त्यावेळी मासे विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवून बैठकीकडे मोर्चा वळविला. सुमारे दोन तास त्यांनी तेथे ठाण मांडले. यावेळी वास्को पोलिसांना तैनात करण्यात आले होते. बैठक संपल्यावर मासळी विक्रेत्यांनी नगराध्यक्षांवर प्रश्नांचा मारा केला. ‘नवीन मासे मार्केटात व्यवसाय करावयाचा नसेल, तर त्या मासे विक्रेत्यांनी घरी जावे’ असे वक्तव्य कोणत्या आधारावर केल्याचे त्यांनी विचारले. ते मार्केट आमचे आहे, आम्ही जो निर्णय घेऊ तो अंतिम असेल, असे उपस्थित विक्रेत्यांनी नगराध्यक्षांसमोर बोलून दाखविले.
आम्हाला चांगले मासळी मार्केट बांधून दिल्याबद्दल आम्ही वास्कोचे आमदार दाजी साळकर यांचे आभारी आहोत. परंतु सामंजस्य करारानुसार तेथे पूर्वी असलेले वालंकिणी चॅपेल बांधून देण्याची गरज आहे. करारामध्ये त्या नवीन मार्केटमध्ये हॉल असेल असे कोठेच नमूद करण्यात आले नव्हते. तथापि मुरगाव पालिका महसुलासाठी तेथे हॉल बांधत आहे. त्याला आम्ही हरकत घेतली नाही. करारामध्ये जे मुद्दे आहेत त्याची कार्यवाही संबंधितांनी करण्याची गरज क्रिस्तोडियो डिसोझा यांनी व्यक्त केली.
वक्तव्याचा विपर्यास : नगराध्यक्ष बोरकर
नगराध्यक्ष बोरकर यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आपणास जे काही म्हणायचे होते त्याचा विपर्यास झाला आहे. तेथे 250 मासे विक्रेत्यांसाठी जागा आहे. तेथे एखादा विक्रेता मासे विक्री करण्यासाठी न बसल्यास ती जागा आम्ही दुसर्याला देणार आहोत. कारण जागा रिकामी राहिल्यास महसूल बुडण्याची शक्यता आहे, असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष बोरकर यांनी दिले. त्यानंतर क्रिस्तोडियो डिसोझा यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण निवळले.