मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत Pudhari File Photo
Published on
:
08 Feb 2025, 1:12 am
Updated on
:
08 Feb 2025, 1:12 am
पणजी : ज्या मुंडकारांनी अद्याप खटले सादर केलेले नाहीत, त्यांनी लवकरच ते सादर करावेत. यापुढे तीन सुनावणीत हे खटले निकाली काढले जाणार. डिसेंबर 2026 पर्यंत मुंडकारांचे सर्व खटले निकाली काढले जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले.
ते म्हणाले, राज्यात 2408 मुंडकार प्रकरणे मामलेदारांसमोर न्यायप्रविष्ट आहेत. यापुढे या सुनावणीचे मामलेदार बदलले जाणार नाहीत. ते शनिवार व रविवारीही सुनावणी घेऊन ही प्रकरणे निकाली काढणार आहेत. तीन सुनावणीच्या आत निवाडा दिला पाहिजे, अशी सक्त ताकीद त्यांना देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. ते म्हणाले, 2022 नंतर एकूण 2 हजार 825 प्रकरणे होती. त्यापैकी 2 हजार 304 खटले दोन वर्षांत निकालात काढण्यात आले आहेत. त्यानंतर 1 हजार 887 नवीन खटले आले असून, सध्या 2 हजार 408 खटले सुनावणीसाठी आहेत. कितीही नवीन खटले आले तरी सर्व खटले डिसेंबर 2026 पर्यंत निकालात काढण्यात येतील.
आमदार जीत आरोलकर यांनी, मुंडकार खटले जलद गतीने निकाली काढण्यासंबंधी ठराव मांडला होता. मुंडकारांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत, अशा मागणी करतानाच मुंडकारांच्या समस्या सोडवण्यासाठी नवा कायदा तयार करण्याची आवश्यकता आहे. मुंडकारांसंबंधी सद्यस्थितीचा अहवाल तयार करणे आवश्यक आहे. देवस्थानमध्ये असलेल्या मुंडकारांनाही अधिकार मिळाला पाहिजे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.