Published on
:
24 Nov 2024, 12:00 am
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महायुतीला दणदणीत यश मिळाले असून, महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जादू मुंबईत चालली नाही. मुंबईतील 36 जागांपैकी महायुतीचे 23 आमदार निवडून आले, तर महाविकास आघाडीला फक्त 12 जागांवर समाधान मानावे लागले आहे. समाजवादी पार्टीचे अबू असिम आझमी यांनी मात्र आपली जागा कायम राखली आहे.
राज ठाकरे यांनी आपला पुत्र अमित याला निवडून आणण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली होती; पण हे आव्हान त्यांना पेलवता आलेले नाही. आदित्य ठाकरे यांचा विजय उद्धव ठाकरे यांच्यासाठी काहीशी जमेची बाजू आहे. या निवडणुकीत मुंबईकरांनी भाजपबरोबरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती दिल्याने लवकरच होणार्या महानगरपालिका निवडणुकीतही हाच कल राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरांतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपने 16 मतदारसंघांत भाजपचे आमदार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मुंबईत फारशी ताकद नसतानाही तब्बल सहा आमदार निवडून आले आहेत. हा ठाकरेंसाठी मोठा धक्काच मानला जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुंबईत खाते उघडले असून, अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक या विजयी झाल्या आहेत.
महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंचे 9 आमदार निवडून आले असून, काँग्रेसचे 3, तर समाजवादी पार्टीचा 1 आमदार निवडून आला आहे. मुंबईत मारलेल्या मुसंडीमुळे मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीसाठी दारे उघडली आहेत. मुंबई महापालिकेच्या शहरातील 227 प्रभागांपैकी पश्चिम व पूर्व उपनगरांतील सुमारे 130 प्रभागांपैकी सुमारे 130 प्रभागांत महायुतीला बहुमत मिळाले आहे. विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे गटाचे सहा आमदार हे उपनगरांतूनच निवडून आले आहेत. मात्र, शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटात गेलेल्या सदा सरवणकर, यामिनी जाधव व रवींद्र वायकर यांची पत्नी मनीषा वायकर यांना मतदारांनी घरी बसवले आहे.
भाजपने यावेळी 15 विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली होती, हे सर्व आमदार पुन्हा विजयी झाले आहेत. बोरिवली विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये मतभेद होते. येथे बंडखोरीही झाली होती. भाजपचे वरिष्ठ नेते माजी खासदार गोपाळशेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता; पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यामुळे बोरिवली विधानसभा मतदारसंघात भाजपला सहज विजय मिळवणे शक्य झाले. येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास मर्जीतील संजय उपाध्याय विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपातील विद्यमान मंत्री आमदार मंगल प्रभात लोढा, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे वरिष्ठ नेते मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी राज्यमंत्री योगेश सागर, विद्या ठाकूर विजयी झाले आहेत. शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, दिलीप मामा लांडे पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आहेत, तर चेंबूर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला यश मिळाले असून, माजी आमदार तुकाराम काते निवडून आले असून, त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर यांचा पराभव केला आहे.
मुंबई शहरातील हा अनपेक्षित निकाल असून, मतदानाच्या अखेरपर्यंत मुंबईत महाविकास आघाडीचे वर्चस्व राहील, असे बोलले जात होते; पण आघाडीला स्वप्नातही वाटले नसेल, असा धक्का महायुतीने दिला आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीला विशेषत: शिवसेना ठाकरे गटाला मुंबई महानगरपालिका निवडणूक सोपी राहिलेली नाही. 1997 पासून मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या ठाकरे गटाला मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करणे अधिक महत्त्वाचे वाटते; पण विधानसभेचा निकाल बघता, यावेळी महानगरपालिकेत सत्ता स्थापन करणे ठाकरेंसाठी अवघड दिसत आहे. परंतु, त्या-त्या वेळीच्या राजकीय गणितावर सर्व काही अवलंबून राहणार आहे.
कालिदास कोळंबकर नवव्यांदा विजयी
भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर सलग नवव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव केला आहे. कोळंबकर सुरुवातीला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेमधून नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती. यातही त्यांना येथील मतदारांनी साथ दिली. त्यानंतर कोळंबकर यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतरही त्यांच्या विजयाची हॅट्ट्रिक सुरूच राहिली. मुंबईतून सलग नऊ वेळा निवडून येणारे ते एकमेव आमदार आहेत.