Published on
:
31 Jan 2025, 11:41 pm
Updated on
:
31 Jan 2025, 11:41 pm
वाई : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने स्वत:च्या लहान मुलाचा कालव्यामध्ये ढकलून खून केला होता. याप्रकरणी आई आणि तिच्या प्रियकराला वाईचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, इतिहासात प्रथमच वाई न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
अश्विनी प्रकाश चव्हाण (वय 35, नावेचीवाडी, वाई) आणि तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार (वय 48, रा. बावधन, ता. वाई) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत; तर या दोघांनी अवघ्या चार वर्षाच्या गौरव प्रकाश चव्हाण याचा दि. 28 एप्रिल 2019 कालव्यात ढकलून खून केला होता.
ही घटना घडल्यानंतर तत्कालीन पोनि आनंदराव खोबरे व सपोनि महेंद्र निंबाळकर यांनी गौरवची आई असलेल्या अश्विनीकडे उलट चौकशी केली. यामध्ये तिच्या बोलण्यात विसंगती आढळून येत होती. ती प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती तपासी अधिकार्यांना देत होती. यामुळे पोलिसांना संशय आला. तिच्याकडे अधिक चौकशी करत असताना तिने अनैतिक संबंधांमध्ये अडथळा येत असल्याने तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार याच्या मदतीने गौरवचा धोम धरणाच्या कालव्यात ढकलून खून केला असल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे सचिन कुंभार याला अटक केली.
यानंतर पोनि आनंदराव खोबरे यांनी वाई न्यायालयात अश्विनी व सचिन यांच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात याची सुनावणी झाली. यामध्ये सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून दोघांना वाईचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, सरकारतर्फे अॅड. एम.यु. शिंदे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले होते. त्यांना हवालदार हेमा कदम यांनी सहाय्य केले.