Published on
:
06 Feb 2025, 12:33 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:33 am
लंडन : जो जन्मला आहे, त्याचा एक दिवस मृत्यू अटळ आहे. ‘जन्ममृत्युजराव्याधी दुःखदोषानुदर्शनम्’ असे गीतेत म्हटले आहे. अर्थात जन्म, आजारपण, वृद्धावस्था आणि मृत्यू हे देहाचे दोष आहेत. मात्र, आपला खरा ‘मी’ किंवा ‘आत्मा’ अजरामरच असतो, असेही गीतेत म्हटलेले आहे. मात्र, जिवंतपणी बहुतांश लोकांचे देहाशीच तादात्म्य असल्याने देहालाच ‘मी’ समजून सर्व व्यवहार सुरू असतात व त्यामुळेच मृत्यूने आपले अस्तित्व संपेल, असे वाटून त्याचे भयही वाटत राहते. मृत्यूच्या क्षणी काय होते, याबाबत प्राचीन काळापासूनच माणसाला कुतूहल आहे. कठोपनिषदात नचिकेता नावाच्या बालकाने साक्षात मृत्यूची देवता असलेल्या यमराजालाच याबाबतचे प्रश्न विचारले होते. आधुनिक काळात अनेक लोकांचे ‘निअर डेथ एक्सपिरिअन्स’ म्हणजेच मृत्यू निकट असताना येणारे अनुभव प्रसिद्ध आहेत. मृत्यूवेळी अनेकांसमोर आपलाच जीवनपट एखाद्या चित्रपटातील फ्लॅशबॅकप्रमाणे समोर उभा राहतो, असे म्हटले जाते. आता विज्ञानानेही या मुद्द्याला अधोरेखित केले आहे.
मृत्यूवेळी माणसाच्या मेंदूत काय हालचाली घडतात, याबाबत अनेक दशकांपासून संशोधन सुरू आहे. आता प्रथमच एका मानवी मेंदूमधील मृत्यूच्या वेळेच्या हालचालींना रेकॉर्ड करण्यात यश आले आहे. त्यामधून हे दिसून आले की, मृत्यूपूर्वी लोक एक ‘लाईफ रिव्ह्यू’चा अनुभव करतात. त्यांच्या डोळ्यांसमोर किंवा मनात त्यावेळी आपले संपूर्ण गतायुष्य उभे राहते. लहानपणापासून घडलेल्या अनेक घटना त्यांना त्यावेळी आठवतात. ‘डेली मेल’च्या एका रिपोर्टनुसार हे रेकॉर्डिंग 87 वर्षे वयाच्या एका रुग्णाच्या मेंदूचे आहे. या रुग्णावर अपस्मारासाठीचे उपचार सुरू होते. मात्र, त्यावेळी त्याचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी डॉक्टरांनी त्याच्या मेंदूच्या हालचाली मॉनिटर करण्यासाठी एक उपकरण लावले होते. उपचारादरम्यानच रुग्णाची हृदयक्रिया बंद पडली आणि त्याचा मृत्यू झाला.
मात्र, या काळात सुमारे 900 सेकंदांपर्यंत मेंदूमधील हालचाली या उपकरणाने रेकॉर्ड केल्या. त्यांना आढळले की, मेंदूचा जो भाग आठवणींशी निगडित असतो, तो मृत्यूच्या क्षणीही सक्रिय होता! या शोधाचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. अजमल जेममार यांनी सांगितले की, या ब्रेन वेव्ज म्हणजेच मेंदूतील लहरी आठवणी पुन्हा ताज्या केल्याचे दर्शवतात. त्यामधून असे दिसते की, मृत्यूवेळी मेंदू कदाचित आयुष्यामधील महत्त्वाच्या घटनांचे शेवटचे अवलोकन करीत होता! ‘निअर डेथ एक्सपिरिअन्स’ मध्येही अनेक लोकांनी आपल्या डोळ्यांसमोर आपला जीवनपट उभा राहिला होता, असे जीव वाचल्यानंतरच्या मुलाखतींमध्ये सांगितले होते. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, मेंदूमधील अनेक घडामोडी, जसे गामा वेव्ज, मेंदूच्या उच्च जाणिवेच्या कार्यांशी निगडित असतात. त्यामध्ये आठवणींची पुनर्प्राप्ती आणि जीवनाच्या महत्त्वपूर्ण घटनांची समीक्षा समाविष्ट असू शकते. मृत्यूच्या वेळी मेंदू एका निश्चित प्रक्रियातून जाऊ शकतो, जी जीवनाच्या अंतिम क्षणांमध्ये आपल्या शारीरिक व मानसिक बदलांना नियंत्रित करू शकते.