राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यामध्ये झालेल्या दुरंगी लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांनी 30 हजार मतांनी विजय मिळवला. गेल्या सहा टर्मपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या मोहोळ विधानसभा मतदार संघाच्या बालेकिल्ल्याला यंदा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीने छेद दिला. मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील नेत्यांची झालेली ऐकी मोहोळ विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची शिल्पकार ठरली.
मोहोळ विधानसभेमध्ये एकूण 65.69 टक्के मतदान झाले. मतदार संघाला मोहोळ ,पंढरपूर व उत्तर सोलापूर या तीन तालुक्यातील 145 गावे जोडली गेली आहेत. निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नव्याने झालेले अप्पर तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, पोखरापूर तळ्यातील पाणी प्रश्न, सीना भोगावती जोड कालवा,मतदारसंघातील रस्त्यांची स्थिती, तालुक्याच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे नियोजन अभाव, शहरातील क्रिडांगण व उपजिल्हा रुग्णालयाच्या रखडलेल्या प्रश्नाबाबत महाविकास आघाडीतील व संघर्ष समितीतील नेत्यांनी सभांमधून मुद्दे गाजविले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने या नेत्यांनी वरील प्रश्नासंदर्भातील भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित होते, मात्र आमदार माने यांनी मतदार संघात साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी आणला यावरच गावोगावी प्रचार सभा घेतल्या.
आ. यशवंत माने यांना या विधानसभेच्या निवडणुकीत नव्यानेच मंजूर झालेल्या अनगरच्या अप्पर तहसील कार्यालयाने चांगलेच अडचणीत आणले. विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे, बळीराम साठे, उमेश पाटील, गणेश वानकर, दीपक गायकवाड, विजयराज डोंगरे, चरणराज चवरे, संजय क्षीरसागर, सतीश जगताप, काका देशमुख, बाळासाहेब गायकवाड, मानाजी माने, रमेश बारसकर, सीमा पाटील, अशोक भोसले, सत्यवान देशमुख,महेश देशमुख, विक्रम देशमुख,संजय विभुते, शामराव जवंजाळ,अॅड. विनोद कांबळे, दीपक गवळी, उज्वला थिटे - पाटील, चंद्रकांत गोडसे, शिवरत्न गायकवाड, सतीश पाटील, सचिन सुरवसे आदींसह महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवार राजू खरे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
अनगर व बारा वाड्यांच्या मताधिक्याच्या भरोशावर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येऊ शकतो हे गेल्या अनेक निवडणुकांपासून राष्ट्रवादीने सिद्ध करून दाखवले होते. परंतु या निवडणुकीत महाविकास आघाडी व मोहोळ तालुका संघर्ष समितीने लावलेल्या यंत्रणेसमोर राष्ट्रवादीची यंत्रणा प्रभावी ठरली नाही.खा. शरद पवार यांच्या विचारावर विश्वास ठेवून संपूर्ण मतदारसंघाने राष्ट्रवादीच्या तालुक्यातील नेतृत्वाला अमान्य करत विजयाचा झेंडा रोवला.