छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांच्यातील बंध दाखवणारं ‘छावा’मधील ‘जाने तू’ हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून गायक अरिजित सिंगने हे गाणं गायलं आहे. तर इर्शाद कामिल यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटातील या दोघांची केमिस्ट्री या गाण्यात सहज पहायला मिळते. त्याचप्रमाणे चित्रपटाची भव्यतासुद्धा या गाण्यात पहायला मिळते. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांच्या आयुष्यातील काही आनंदाचे क्षणही या गाण्यात चित्रित करण्यात आले आहेत. त्याचसोबत गाण्याच्या शेवटी युद्धभूमीवरील महाराजांच्या पराक्रमाची झलकही त्यात दाखवण्यात आली आहे. हे गाणं प्रदर्शित होताच त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला माहीत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला,’ असं एकाने लिहिलं. तर ‘या गाण्याचा शेवट बघताच डोळ्यात पाणी आलं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. तर काहींना हे गाणं आवडलंय, मात्र ‘छावा’सारख्या चित्रपटासाठी ते योग्य नसल्याचं वाटतंय.
हे सुद्धा वाचा
दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरवरून वाद निर्माण झाला होता. ‘छावा’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका दृश्यावरून विविध स्तरांतून आक्षेप घेण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणाी येसूबाई यांचा लेझीम नृत्य करतानाचा हा प्रसंग होता. या प्रसंगावर संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्षेप घेतला होता. तसंच उदयनराजे भोसले यांनीही दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करून इतिहासतज्ज्ञांना विचारात घेऊन संबंधित प्रसंगामध्ये आवश्यक बदल केल्यास वाद संपेल, असं सांगितलं होतं. या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर आणि राजकीय मंडळींसह अनेकांनी या प्रसंगाला घेतलेला आक्षेप विचारात घेऊन चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचा प्रसंद काढला जाणार असल्याचं उतेकर यांनी स्पष्ट केलं.