Published on
:
21 Jan 2025, 11:56 pm
Updated on
:
21 Jan 2025, 11:56 pm
बीजिंग : काही फळे अतिशय महाग असतात. त्यामध्ये जपानमधील रुबी रोमन ग्रेप्स ही लाल द्राक्षे, युबारी नावाचा टरबूज, डेन्सुके कलिंगड, मियाझाकी आंबा आदींचा समावेश होतो. काही फळांपेक्षा त्याच्या बिया अतिशय महत्त्वाच्या ठरतात. कॉफीच्या बिया असोत किंवा चॉकलेट ज्यापासून बनते त्या कोकोआ फळाच्या बिया असोत, त्यांना मोठीच मागणी असते. मात्र काही फळांच्या सालीही महागड्या असतात हे तुम्हाला माहिती आहे का? चीनमध्ये एका फळाच्या वाळवलेल्या साली अशाच अतिशय महाग असून त्यांना मोठी मागणीही असते. या फळाचे नाव आहे कीनू किंवा टेंजेरीन. हा चिनी संत्र्यांचा किंवा मोसंबीसारख्या फळाचा एक प्रकार आहे.
एका रिपोर्टनुसार, चीनमधील पारंपरिक वनौषधींमध्ये कीनूच्या जुन्या सालींचा वापर केला जातो. त्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असल्याचे मानले जाते. या सालींमध्ये अनेक औषधी गुणधर्म तसेच पोषक घटक असतात. या फळाच्या झाडांची वाढ अनेक ठिकाणी होत असले तरी चीनच्या गुआंगडोंग राज्यातील जियांगमेनच्या पूर्व किनार्यावरील फळांना अधिक महत्त्व आहे. या फळांची किंमत अतिशय जास्त असते. या फळाच्या वाळवलेल्या सालींना ‘चेपनी’ असे म्हटले जाते. ही चेपनी बनवणेही सोपे काम नाही. सलग तीन वर्षे पानगळीच्या दिवसांमध्ये तसेच थंडीत या साली उन्हात वाळवाव्या लागतात. या साली जितक्या जुन्या असतील तितक्या अधिक गुणकारी असल्याचे मानले जाते. या सालींचा वापर औषधांबरोबरच खाद्यपदार्थात तसेच मद्यनिर्मितीतही केला जातो. 2023 मध्ये हाँगकाँगमधील एक लिलाव या सालींच्या किमतीबाबत चर्चेत आला होता. त्यावेळी 1968 मधील एक किलोग्रॅम कीनूच्या सालींचा लिलाव 9646 अमेरिकन डॉलर्समध्ये झाला. एका स्थानिक माणसाने या सालींच्या विक्रीतून सुमारे 13.8 अब्ज डॉलर्स कमावले!