Published on
:
22 Jan 2025, 12:10 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:10 am
मारूल हवेली : प्रशासनाने कचर्यासंदर्भात कितीही जनजागृती, उपाययोजना केल्या तरी रस्त्याकडेला कचर्याचे ढीग पहावयास मिळत आहेत. नागरिक उघड्यावर कचरा आणून टाकत असल्याचे वारंवार समोर येत असल्याने या कचर्याचे करायचे काय हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्यावर येणारा कचरा बंद व्हावा यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना करत असते. स्वच्छतेसाठी कोट्यवधी रूपये खर्ची पडत असताना. त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. शहराच्या प्रवेशद्वारासह विविध मार्गाच्या कडेला कचर्याचे ढीगच्या ढीग पाहावयास मिळत आहेत.त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिक घरातून येताना कचर्याची पिशवी घेऊन येत असतात. पूल दिसला, कचर्याचा ढीग दिसला किंवा नदी दिसली की कचरा टाकतात. अशी नागरिकांची तर्हा पाहावयास मिळत आहे. पूल परिसरात प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पाहावयास मिळत आहेत. तसेच कचरा कुजल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. हा कचरा वार्यामुळे रस्त्यावर पसरत आहे. कचर्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. ही कुत्री काहीवेळा दुचाकीस्वारांचा पाठलाग करतात. त्यामुळे अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय कचर्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
कराड -पाटण मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी कचर्याचे ढीग दिसून येत आहे. दिवसेंदिवस यामध्ये भरच पडत आहे. हॉटेल चालक व खाद्यपदार्थाचे गाडेचालकही रात्री या ठिकाणी खरकटे अन्न टाकत असल्याने दुर्गंधी पसरलेली असते. ग्रामपंचायत, बांधकाम विभाग व प्रशासनाकडे सार्वजनिक स्वच्छतेकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
कचर्याचे ढिगारे गंभीर समस्या ..
कराड येथील वारूंजी फाटा, उंब्रजमधील पाटण तिकाटना व महामार्ग पुलाखाली, विहे, उरूलचा घाट रस्ता यांसह विविध भागांतील रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. त्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, खराब झालेल्या व न वापरात येणार्या वस्तूंचा समावेश आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने सर्रास हा कचरा रस्त्याच्या कडेला टाकून निघून जात आहेत. वर्षानुवर्षे हा कचरा त्याच ठिकाणी पडून राहत आहे. त्यामुळे हळूहळू या कचर्याचे ढिगारे तयार होऊ लागले आहेत. हा कचरा कुजून आजूबाजूच्या परिसरात याची दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते.
अस्वच्छतेमुळे विद्रूपीकरण
शासनाच्या वतीने स्थानिक संस्थाच्या मार्फत स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम राबविले जात असतात, असे असतानाही विविध भागांत काही नागरिक कचरा थेट रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला फेकून देत आहेत. यामुळे शहर अथवा गाव विद्रूप होऊ लागले आहे.