Published on
:
18 Nov 2024, 12:56 am
Updated on
:
18 Nov 2024, 12:56 am
कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीचेच स्थिर आणि भक्कम सरकार येणार, असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी व्यक्त केला. सध्याचे सरकार हे चोरीचे सरकार आहे, लोक या सरकारमुळे बेजार झाले आहेत, अशी खरमरीत टीकाही त्यांनी कोल्हापूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केली.
भाजपला हरवून नवे सरकार आणण्यासाठीच आम्ही एकत्र आल्याचे सांगत खर्गे म्हणाले, ‘पन्नास खोके एकदम ओक्के’वाले हे महायुतीचे सरकार सत्तेतून पायउतार होणार हे स्पष्ट आहे. नवे आणि मजबूत महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना मिळणारा प्रतिसाद पाहता तसे स्पष्ट दिसत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईतही महाविकास आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, तसा फीडबॅकही येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान खुर्ची वाचवण्यासाठी तालुकास्तरावरही जात आहेत
पंतप्रधान मोदींची खुर्ची सुरक्षित नाही. लोकसभेत त्यांना कमी जागा मिळाल्या. केंद्रातील सरकार स्थिर नाही. त्यांची खुर्ची दोन पायावरच उभी आहे, ती वाचवण्यासाठी ते आता तालुका पातळीवरही जात आहेत, अशी टीका करत खर्गे म्हणाले, आम्हीही खूप निवडणुका पाहिल्या; पण राज्यस्तरावरील निवडणुकासाठी आम्ही कधी गेलो नाही. मात्र, या ठिकाणी पंतप्रधान आले. देशाचे केंद्रीय गृहमंत्री आले. ही निवडणूक महाराष्ट्राची आहे. येथील जनताच येथील सरकार ठरवले.
त्यांना मणिपूरमध्ये जायला वेळ नाही
पंतप्रधान यांनी प्रथम देशातील जनतेसाठी काम करावे. त्यांना जनतेने पंतप्रधान बनवले आहे. त्यांचे देशावर प्रेम नाही. जनतेच्या समस्या सोडवण्याचा त्यांच्याकडे काही उपाय नाही, अशी टीका करत खर्गे म्हणाले, जनतेचे, देशाचे काहीतरी भले करण्यासाठी तुम्हाला जनतेने निवडले आहे. मात्र, पंतप्रधान खुर्ची टिकवण्यासाठी ते महाराष्ट्र, झारखंडमध्ये फिरत आहेत; पण त्यांना मणिपूरमध्ये जायला वेळ नाही. तिथे लोक मरत आहेत. दुसरीकडे ‘एक हैं, तो सेफ हैं’ असे सांगत आहेत. हे ‘सेफ’ हिमाचलमधील की काश्मीरमधील? अशा शब्दांत त्यांच्या विधानाची खिल्लीही खर्गे यांनी उडवली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही ‘बटेंगे तो कटेंगे’ असा महाराष्ट्रात प्रचार करत फिरत आहेत. तिकडे रुग्णालयात लहान मुलांचा जीव जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, कर्नाटकचे आमदार हसन मौलाना, माजी आमदार अंजली निंबाळकर, कोल्हापूर उत्तर विधानसभेचे निरीक्षक सुखविंदर ब—ार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक तोफिक मुल्लानी, बाळासाहेब सरनाईक, संध्या घोटणे, सरलाताई पाटील, भारती पोवार आदी उपस्थित होते.