Published on
:
23 Nov 2024, 11:45 pm
Updated on
:
23 Nov 2024, 11:45 pm
सिंधुदुर्ग : कणकवलीतून भाजपचे नितेश राणे यांनी 58,007 इतके मताधिक्य घेऊन विजयाची हॅट्ट्रिक केली, तर शिंदे शिवसेनेकडून कुडाळमध्ये विधानसभा प्रारंभासाठी उभारलेले नीलेश राणे यांनी 8,176 इतक्या मताधिक्याने ठाकरे शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांचा पराभव केला. लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेत आणि तेही दोघा सख्या भावांनी मिळविलेला हा विजय डबल बार काढणारा ठरला. सावंतवाडीतही शिंदे शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी चौथ्यांदा विजय मिळविला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागा महायुतीने जिंकल्याने ठाकरे शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. या निकालाने ठाकरे यांनी तळकोकण हा बालेकिल्ला गमावला आहे.
नितेश राणे 2014 मध्ये कणकवली मतदारसंघातून काँग्रेसमधून निवडून आले होते. 2019 मध्ये त्यांनी भाजपातून निवडणूक लढवून 28 हजारांचे मताधिक्य घेऊन दुसरा विजय मिळविला होता. आता तिसर्यांदा तब्बल 58 हजारांचे मताधिक्य मिळवत त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. नितेश राणे यांनी 1 लाख 8 हजार 369 इतकी मते मिळवली आहेत. ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांना 50 हजार 362 इतकी मते मिळाली असून त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
नीलेश राणे 2009 मध्ये लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांचा दोनवेळा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. या निवडणुकीत त्यांनी भाजपमधून शिंदे शिवसेनेत प्रवेश करून कुडाळ-मालवण मधून निवडणूक लढविली. त्यात एकूण 81 हजार 659 इतकी मते मिळवून 8 हजार 176 इतक्या मताधिक्याने त्यांनी विजय मिळविला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय वैभव नाईक यांना हॅट्ट्रिक साधता आली नाही. त्यांना 73 हजार 483 इतकी मते मिळाली आणि त्यांना पराभव पत्करावा लागला.
दीपक केसरकर यांनी मात्र चौकार लगावला असून 39 हजार 899 इतके मताधिक्य घेत मोठा विजय मिळविला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार ठाकरे सेनेचे राजन तेली यांना 41 हजार 109 इतकी मते मिळाली. या मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी 33 हजार 281 इतकी मते मिळवून ते प्रभावी ठरले. महाविकास आघाडीच्या बंडखोर उमेदवार अर्चना घरे-परब यांना मात्र 6 हजार 174 इतक्याच मतांवर समाधान मानावे लागले. केसरकर यांनी एकूण 81 हजार 8 इतकी मते मिळविली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर उमेदवारांचा प्रभाव जेमतेम राहिला.
घराणेशाहीचा मुद्दा प्रभावहीन अन् राणे कुटुंबीयांसाठी आनंदाचा क्षण
खा. नारायण राणे गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. या निवडणुकीत नितेश राणे आणि नीलेश राणे यांना निवडणुकीत उतरविल्याने त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप झाला होता; मात्र हा मुद्दा प्रभावहीन ठरला. दोन्ही राणेबंधू निवडून आले. हा आमच्या कुटुंबीयांसाठी आनंदाचा क्षण असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.