Published on
:
23 Nov 2024, 11:47 pm
Updated on
:
23 Nov 2024, 11:47 pm
रायगड : रायगड जिल्ह्यात सातही विधानसभेच्या जागांवर महायुतीने 100 टक्के यश मिळवले आहे. श्रीवर्धन, पनवेल, पेण या जागा महायुतीने मोठ्या मताधिक्याने जिंकल्या, तर महाड, कर्जत, उरण, अलिबागमध्ये जोरदार लढती झाल्याचे पाहायला मिळाले.
पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर यांनी 51 हजार मताधिक्याने विजयाचा चौकार मारला आहे. प्रशांत ठाकूर यांना 1 लाख 82 हजार 818, तर बाळाऱाम पाटील यांना 1 लाख 32 हजार 235, तर ठाकरे सेनेच्या लिना गरड यांना 43 हजार 504 मते मिळाली. येथे महाविकास आघाडीनेे एकच उमेदवार दिला असता, तर मोठी रस्सीखेच झाली असती. कारण महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांना 1 लाख 75 हजार मते मिळाली आहेत.
पेणमध्ये भाजपचे रवींद्र पाटील
पेण विधानसभा मतदारसंघात भाजपचे रवींद्र पाटील हे महायुतीच्या तिकिटावर दुसर्यांदा विजयी झाले. त्यांना 60 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. पाटील यांना 1 लाख 24 हजार, तर ठाकरे शिवसेनेचे प्रसाद भोईर यांना 63 हजार, तर शेकापचे अतुल म्हात्रे यांना 29 हजार. शेकाप नेते धैर्यशील यांना भाजपात घेऊन राज्यसभा खासदार केल्याचा फायदा भाजपला या मतदारसंघात मिळाला आहे.
कर्जतमध्ये शिंदे शिवसेनेचे महेंद्र थोरवे 5 हजारांच्या मताधिक्याने काठावर उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना एकूण 94 हजार 871, तर बंडखोर सुधाकर घारे यांना 89 हजार 177 मते मिळाली, तर ठाकरे सेनेचे नितीन सावंत यांना 48 हजार 929 मते मिळाली. घारेंना ठाकरे शिवसेनेने उमेदवारी दिली असती, तर येथे वेगळे चित्र दिसले असते. या शिवाय नामसार्धम्यांच्या दोन सुधाकर घारे यांनी 3 हजारांपेक्षा अधिक मते मिळवली आहेत.
उरणमध्ये महेश बालदी यांनी 21 व्या फेरी अखेर 6 हजारचे मताधिक्य मिळवले. त्यांना शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी जोरदार लढत दिली आहे. 21 व्या फेरीअखेर बालदी 80 हजार, प्रीतम म्हात्रे 83 हजार, मनोहर भोईक 56 हजार मतांपयर्र्ंत पोहोचले होते.
अलिबागमध्ये शिंदे सेनेचे महेंद्र दळवी यांनी 29 हजार मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांना एकूण 1 लाख 13 हजार 599, तर चित्रलेखी 84 हजार 34, तर अपक्ष दिलीप भोईर यांना 32 हजार 210 मते मिळाली आहेत.
आदिती तटकरे यांना 82 हजारांचे मताधिक्य
आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात अजित पवारांच्या या उमेदवाराने सर्वाधिक 82 हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला. आदिती तटकरे महिला बालकल्याण मंत्री आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार राष्ट्रवादीचे अनिल नवगणे यांना 33 हजार 52, तर काँग्रेस अपक्ष राजा ठाकूर यांना 4 हजार मते मिळाली.
महाड मतदारसंघात भरत गोगावले यांनी 26 हजार मताधिक्याने चौथ्यांदा विजय मिळवला. त्यांना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांनी जोरदार लढत दिली. त्यांना 91 हजार 912 मते मिळाली आहेत. गोगावले यांना 1 लाख 17 हजार 442 मते मिळाली आहेत.