Published on
:
18 Jan 2025, 1:25 am
Updated on
:
18 Jan 2025, 1:25 am
देवरुख : धावत्या रेल्वे गाडीची धडक बसून बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास संगमेश्वरजवळील कोंड असुर्डे येथे रेल्वे रुळावर घडली.
सकाळच्या सुमारास संगमेश्वजवळच्या असलेल्या जांभूळवाडी या ठिकाणी रेल्वे रुळावर बिबट्या मृत्युमुखी पडला असल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांनी वन विभागाला दिली. बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक सुरज तेली, वनरक्षक अरुण माळी यांच्यासह पोलिस पाटील सुभाष गुरव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
यात बिबट्याचा रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याचे दिसून आले. घटनास्थळाची पाहणी केली असता या घटनेतील मृत प्राणी मादी बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. ती 2 वर्षांची असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी बेलोरे यांनी करुन अंतिम संस्कार करण्यात आले.