Published on
:
30 Jan 2025, 11:30 pm
Updated on
:
30 Jan 2025, 11:30 pm
फलटण : लग्न जमवून आर्थिक फसवणूक करणार्या टोळीचा पर्दाफाश करत फलटण ग्रामीण पोलिसांनी पाचजणांच्या टोळीला गजाआड केले. लग्नाळूंना लुटणार्या संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
जयश्री दत्तू शिंदे (रा. चिखली ता. हवेली, जि. पुणे), शशिकला तुकाराम जाधव (रा. चिखली ता. मंगळरूपीर, जि. वाशिम), सुमित्रा गजानन डाखोरे, गजानन नामदेव डाखोरे, गोकुळ ज्ञानदेव लोंढे (तिघे रा.तांदूळवाडी ता.जि. सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. तर दिपाली प्रभू जाणे (रा. पाटणादेवीरोड, रोशननगर ता. चाळीसगाव जि.जळगाव) व छाया साठे (रा.आळंदी जि. पुणे) या दोघी पसार आहेत.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी असलेल्या 44 वर्षीय फिर्यादीचे लग्न जमत नव्हते. त्यांच्या ओळखीचे बट्टू गोरे (रा. कुरवली ता. फलटण) यांनी त्यांना छाया साठे हिचा फोन नंबर देऊन ती लग्न जुळवण्याचे काम करत असल्याचे सांगितले. फिर्यादीने छाया साठे हिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर साठे व तिची साथीदार जयश्री शिंदे यांनी संगनमत करुन दोन मुले असलेल्या दिपाली जाणे या महिलेशी फिर्यादीचे आळंदी येथे लग्न लावून दिले. त्या बदल्यात त्यांनी फिर्यादीकडून 2 लाख 75 हजार रुपये घेतले. मात्र दिपाली जाणे ही लग्नानंतर सहा दिवसातच फिर्यादीस आपल्याला पूर्वीच्या लग्नानंतर दोन मुले असल्याचे सांगून तेथून निघून गेली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने जयश्री शिंदे व छाया साठे यांच्याकडे पैसे परत मागितले. त्यावर या दोघींनी त्यांना दुसरी मुलगी दाखवते, असे सांगून त्याकरता दीड लाख रुपयांची मागणी केली.
चर्चेनंतर दि. 27 जानेवारी रोजी जयश्री शिंदे या शशिकला जाधव हिला नवरी मुलगी म्हणून फलटण एसटी स्टँडवर आल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत गजानन डाखोरे, सुमित्रा डाखोरे व गोकुळ लोंढे हे होते. मात्र संबंधित व्यक्ती नवरी मुलीचे खोटे नातेवाईक असल्याचे भासवून फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने ही बाब फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि सुनील महाडिक यांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना अटक केली. तपास पोलिस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करत आहेत. या टोळीकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोनि सुनील महाडिक यांनी केले आहे.