Published on
:
15 Nov 2024, 11:33 pm
Updated on
:
15 Nov 2024, 11:33 pm
पणजी : मनुष्यबळ सेवा पुरवणार्या एका कंपनीचे सात महिन्यांचे प्रलंबित बिल देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी ‘सीबीआय’कडून शुक्रवारी प्राप्तीकर खात्याच्या लेखा विभागातील सीएजी (कंट्रोलर ऑफ अकाऊंट जनरल) पंकज कुमार याला अटक केली. याप्रकरणी अतुल वाणीला गुरुवारी अटक करण्यात आली होती.
पणजीत गुरुवारी 1 लाख रुपयांची लाच घेताना या दोन्ही संशयित अधिकार्यांना सीबीआयच्या गोवा विभागाने रंगेहात पकडले होते. मुख्य संशयितांची ‘सीएजी’कडून गोवा प्राप्तिकर खात्याच्या लेखा विभागात नियुक्ती करण्यात आली होती. चतुर्वेदी यांनी ‘सीबीआय’कडे या लाच प्रकरणी 13 रोजी तक्रार नोंदवली होती. फिर्यादीच्या कंपनीचे सात महिन्यांचे बिल अदा करण्यासाठी संशयित पंकज कुमार याने 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. ही लाच न दिल्यास बिलाची रक्कम दिली जाणार नसल्याचे संशयितांनी स्पष्ट केले होते.
पाटो- पणजी येथील सेंट्रल लायब्ररीजवळ संशयितांच्या कारवर छापा टाकत दोघा संशयितांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. संशयितांविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 अन्वये गुन्हा नोंदवून सीबीआयने रितसर अटक केली. शिवाय सीबीआयच्या पथकाने संशयितांचे कार्यालय तसेच दोघांच्याही घरावर छापा टाकून आवश्यक दस्ताऐवज जप्त केले आहेत. पुढील तपास सीबीआय गोवाचे उपअधीक्षक अर्जुन कुमार मौर्या यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप हळदणकर करीत आहेत.