लाडक्या बहिणी बदलतील महाराष्ट्राचं राजकारण:विदर्भ-मराठवाड्यात भाजपसह महायुतीला किती जागा मिळतात यावरच ठरेल नव्या सरकारची दिशा

2 hours ago 1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज थंडावेल. जसा महिलांच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही तसा या निवडणुकीचा अंदाज लावणं कठीण आहे. कारण या वेळेस या निवडणुकीत सगळ्यात मोठा फॅक्टर लाडकी बहीण योजनाच राहणार आहे. हे तर स्पष्ट आहे की, सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपतच लढाई आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत समस्या अशी आहे की, अजित पवार ही सर्वात कमजोर कडी आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये इतका कमजोर कोणी नाही. शरद पवारांची तयारी दाखवत आहे की, त्यांच्या पक्षाची कामगिरी चांगली असेल. उद्धवसेना आघाडीत तिसऱ्या क्रमांकावर राहिली तर आश्चर्य वाटायला नको. मराठवाड्यात युतीची स्थिती ‘नावडतीचं मीठही अळणी’ अशी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धचा मराठा समाजातील संताप अजूनही कमी झालेला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा पाडापाडीचा मेसेज दिला आहे, ज्याचा सर्वात मोठा फटका भाजपला बसणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला जेवढे नुकसान झाले तेवढे होणार नाही, पण सगळं नुकसान भरूनही येणार नाही. मराठा, मुस्लिमांनी भाजपविरोधात एकगठ्ठा मतदान केलं तर निश्चितच खूप मोठा फटका बसेल. याला काउंटर करण्यासाठी भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’चे नॅरेटिव्ह चालवले, पण ते फसले आहे. २०१९ मध्ये मराठवाड्याच्या ४६ पैकी २८ जागा युतीला मिळाल्या होत्या. या निवडणुकीत एवढ्या जागा मिळवणंही मोठं आव्हान असेल. इथे सोयाबीन आणि कापसाचा भाव लाडकी बहीण योजनेचा प्रभाव कमी करेल. विदर्भ हा असा दुसरा प्रदेश आहे की, जेथे गेल्या विधानसभेलाही भाजपचे नुकसान झाले होते आणि लोकसभेलाही भाजपने मार खाल्ला होता. पण यंदा इथे लाडकी बहीणचा प्रभाव चांगलाच दिसत आहे. २०१९ मध्ये विदर्भाच्या ६२ पैकी २९ जागा युतीला होत्या. या वेळेस त्याच्यापेक्षा जागा कमी होण्याची शक्यता नाही. जर संघ परिवाराचे प्रयत्न फळाला आले तर ही संख्या ३५ पर्यंत पोहोचू शकते. मुंबई कोणाची? शिंदेसेना आणि उद्धवसेना मुंबईतील ११ जागांवरील आमने-सामने आहेत. या ११ जागांवरील निकाल नक्की करेल की मुंबई कोणाची? ‘बटेंगे तो कटेंगे’ या नाऱ्याची सर्वात जास्त चर्चा मुंबईलाच आहे. अमित ठाकरेच्या उमेदवारीमुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानली जाणारी माहीमची जागा प्रचंड चर्चेत आली आहे. मुंबईमधील गुजराती, राजस्थानी, उत्तर भारतीयांची मोठी संख्या पाहता इथे महायुतीला झुकते माप आहे. कोकणात लोकसभेलाही युतीला फारसे नुकसान झाले नव्हते. इथे रोजगाराचा मुद्दा मोठा आहे, पण मराठा आरक्षण, सोयाबीन-कापसाचे भाव हे मुद्दे तेथे नाहीत. महायुतीला येथे डोकेदुखी कमी आहे. इथेपण शिंदेसेना आणि उद्धवसेनेत काट्याची टक्कर होईल. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची ताकद, प्रभाव जास्त आहे, हे लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आले. म्हणूनच त्यांनी स्वत:ची सर्वाधिक ताकद पश्चिम महाराष्ट्रातच लावली आहे. अजित पवारांसाठी बारामतीची निवडणूक पहिल्यांदाच अस्तित्वाची लढाई झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहे. इथेही काटे की टक्कर आहे. उत्तर महाराष्ट्राच्या ४७ जागांपैकी ४१ जागा जिंकण्याचे टार्गेट भाजपचे आहे. एवढ्या जागा येणे कठीणच आहे, पण भाजपच्या टार्गेटला पाहता हे कळत आहे की, मराठवाड्यात जे नुकसान होईल त्याची भरपाई उत्तर महाराष्ट्र, कोकणातून करण्याची व्यूहरचना भाजपने केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील आदिवासीबहुल मतदारसंघात लाडकी बहीणचा परिणाम अधिक होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने परंपरागत प्रांतात खूप ताकद पणाला लावली आहे. प्रियंका गांधींनी महाराष्ट्रातील प्रचाराची पहिली सभा याच भागात केली. इथे आघाडी, महायुतीचे फार नुकसान करू शकेल, अशी चिन्हे दिसत नाहीत. एकंदरीत पाहिलं तर लोकसभेमध्ये जे यश मिळालं त्यानंतर आघाडीने कोणताही नवा मुद्दा आणलेला नाही आणि दुसऱ्या बाजूला महायुतीजवळ लाडकी बहीणची योजना आहे. या बहिणी एका बोटावर महाराष्ट्राचं राजकारण बदलणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article