>> वर्षा चोपडे
हिंदुस्थानातील केरळ हे राज्य अत्यंत सुंदर, निसर्गरम्य आणि देवभूमी अशी ख्याती असलेले राज्य आहे. तिथले प्रत्येक मंदिर आपले महत्त्व राखून आहे. परंपरा, संस्कार, राहणीमान आणि साधेपणाचा वारसा केरळवासीयांनी आजही जसाच्या तसा राखून ठेवला आहे. मातृसत्ताक असलेले हे राज्य स्त्रियांचा अत्यंत सन्मान करते. तसेच या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाणही कमी आहे. या राज्यातील शक्ती रूपेना आदिपरशक्ती मंदिर अंत्यत भव्य आणि देखणे आहे.
हिंदुस्थानात देवीला आई असे म्हटले जाते. हिंदुस्थानात देवीची अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत. पण केरळचे हे मंदिर अत्यंत अद्भुत स्थापत्यकलेचा नमुना आहे. तसेच उत्तर आणि दक्षिण भारतीय स्थापत्य शैलीचे सुंदर मिश्रण आहे, अद्वितीय संगमरवरी मूर्ती, जटिल लाकूडकाम, दगडी कोरीव काम इत्यादींनी आकर्षिक रूपाने मंदिर सुशोभित केलेले आहे. मंदिर तंजावरच्या शिल्पशैलीमध्ये बांधले गेले आहे आणि ते 12 मीटर उंच आहे. कोईम्बतूर येथील प्रसिद्ध शिल्पकार महालिंगम यांनी गोपुरमची रचना केली होती. कोचीजवळ अलुवा येथे 7 एकरच्या विस्तृत जागेवर आदिपरशक्ती मंदिर आहे. या मंदिर परिसरामध्ये तीन मुख्य देवता आहेत. श्री आदिपरशक्ती, शिव कुडुंबम, ज्यामध्ये शिव पार्वती आणि त्यांची सहा मुले आणि श्री महाविष्णू, त्यांच्या दोन पत्नी, भूदेवी आणि श्रीदेवी यांच्यासह नवग्रहांसह पंधरा उपदेवतांसह आहेत. सप्तमाथा (सात माता), मूलगणपती, वीरभद्र, हनुमान, पंच मुख हनुमान, राधा कृष्ण, काल भैरव, गोमाथावू, भद्रकाली, षण्मुघन, महाकाली, वैष्णवी देवी, चंद्रन आणि आदित्यन यांचे दर्शनही सहज होते. असे म्हणतात, चौवारा आदिपरशक्ती मंदिर आहे तिथे देवी आणि इतर देवतांचे दैवी अस्तित्व होते आणि प्राचीन काळी ऋषीं तिची नियमित पूजा करीत असत. येथील मंदिरातील संगमरवरी राधाकृष्ण मूर्ती, द्वारकेतील मूर्तींसारखीच आहे. उत्सवादरम्यान केरळ तंत्र विधीचे पालन केले जाते आणि मंदिरातील दैनंदिन विधी अत्यंत पारंपरिक पद्धतीने पार पाडले जातात. मंदिरातील अनेक शिल्पे आणि कलाकृतीदेखील दुर्मिळ आणि अत्यंत सुबक आहेत. लोकांना एकत्र आणून, समाजातील बंध मजबूत करून जातीभेद न पाळता येथे अन्नदान केले जाते. मंदिरांमध्ये लोकांना अन्न देणे ही एक पवित्र परंपरा आहे. या मंदिरात करुणा, समानता आणि सामुदायिक एकता या तत्त्वांचे पालन प्राचीन काळापासून केले जाते. संध्याकाळी संपूर्ण मंदिर दिव्यांच्या ज्योतीने उजळून जाते. कोचीन विमानतळापासून केवळ 6.3 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गाजवळील रस्त्याने या मंदिरात सहज जात येते. हे मंदिर चौवारा रेल्वे स्टेशन आणि चौवारा फेरीपासूनही जवळ आहे.