बीड : शिपोरा ते खुटेफळ पाईपलाईन बोगदा कामाचा शुभारंभ सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाला. या योजनेची माहिती समजावून घेताना मुख्यमंत्री. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील, खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. नमिता मुंदडा, आ. विजयसिंह पंडित, आ. संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते.
Published on
:
06 Feb 2025, 12:42 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:42 am
आष्टी : वाहून जाणारे 53 टीएमसी पाणी गोदावरी खोर्यात आणून कोणत्याही स्थितीत मराठवाडा दुष्काळमुक्त करणार, असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ होईल, पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. आष्टी तालुक्यातील ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणार्या खुटेफळ तलावाच्या शिपोरा ते खुटेफळ बोगद्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. वर्षभरात नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू होईल. सौरऊर्जेच्या माध्यमातून शेतकर्यांना दिवसा वीज देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भूमिपूजन कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री पंकजा मुंडे, खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. नमिता मुंदडा, आ. विजयसिंह पंडित, आ. संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठवाडा दुष्काळमुक्त होण्यासाठी आपण यापूर्वी मुख्यमंत्री असताना विविध योजना आखल्या होत्या; पण नंतर सरकार गेल्यामुळे कामे झाली नाहीत. शिंदे यांचे सरकार आल्यानंतर चार नदीजोड प्रकल्प तयार केले. त्याचा पाठपुरावा सुरू केला. सर्व अडचणी दूर केल्या. सर्वेक्षणाचे टेंडर काढले. आता हे काम पूर्णपणे मार्गी लागले आहे. कोणत्याही परिस्थितीत 53 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोर्यात आणले जाईल. पश्चिम डोंगर भागातील जे पाणी समुद्रात जाते ते पाणी गोदावरी खोर्यात आणायचे आहे. आमच्या शासनाचे काम यावर सुरू आहे. तसेच, मराठवाड्यात जलसिंचनाची कामे सुरू झाली आहेत. सौरऊर्जेचे काम वेगाने सुरू असून, त्यामुळे शेतकर्यांना दिवसा वीज देण्यात येईल.